
शरद पवारांना भेटणार राऊत
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. काँग्रेसने स्वतःला आघाडीपासून दूर करत केले. स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या शरद पवारांची भेट घेणार आहेत.
काँग्रेसच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, ते लवकरच शरद पवारांना भेटून त्यांची भविष्यातील भूमिका स्पष्ट करतील. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात युती निश्चित मानली जात आहे. मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे सेनेचे खासदार राऊत आणि आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा एक-दोन दिवसांत केली जाईल.
हेदेखील वाचा : पालिका निवडणुकीचा वाजला बिगुल! राजकीय पक्षाची जोरदार तयारी केली सुरु, बैठकांना आले उधाण
दरम्यान, दोन्ही भाऊ एक पत्रपरिषद घेतील आणि एकाच व्यासपीठावरून युतीची घोषणा करतील. मात्र, या घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते कोणत्या मार्गाने जातात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच
संजय राऊत यांच्या मते, मुंबईत ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिकमध्येही वाटाघाटी अंतिम टप्यात आहेत. उद्धव आणि राज यांच्यातील अंतिम चर्चेनंतर लवकरच युतीची घोषणा केली जाईल. महायुतीप्रमाणे त्यांच्यात कोणताही गोंधळ नाही. ही युती मुंबईसह महाराष्ट्राला जागृत करेल. ही युती सत्ताधारी पक्षासमोर आव्हान निर्माण करेल. ते लवकरच शरद पवार यांची भेट घेतील आणि यावर चर्चा करतील. या युतीत काँग्रेस आता त्यांच्यासोबत नाही.
हेदेखील वाचा : भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार