mp supriya sule target mahayuti government over developmental projects in pune
पुणे : महायुती सरकारमध्ये अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय शिरसाट यांनी त्यांच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी महिला व बाल कल्याण खात्याकडे वळवल्याचा गंभीर आरोप केला. यावरुन आता अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रशासकीय बैठकी आणि आढावा बैठकी घेतल्या आहेत. यानंतर त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पीएमआरडीएचे दोन तीन मुद्दे प्रलंबित आहेत. बनेश्वर रस्ता विलंबित राहिला आहे, त्यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितल्या. 20 तारखेपर्यंत काम सुरू झालं नाही, तर रोजगार हमी योजनेतून काम सुरू करणार आहे. स्वतः रोजगार हमी योजनेचे कार्ड काढणार. सरकारकडून पैसे घेणार नाही, पण मोफत काम करण्याची परवानगी मी सरकारकडे मागणार,” असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “रोजगार हमी योजनेत काम करतात, तसेच सगळे तिकडे फावडे घेऊन जाणार आहोत. २३ मे पासून स्वतःच रस्ता काम सुरू करायला घेणार आहोत. पीएमआरडीए चा हवेली तालुक्यातील रिंग रोड चालला आहे. यामध्ये अनेक लोकांची घरे जात आहेत. स्थानिक कष्ट करणाऱ्या लोकांनी लोन काढून ती घर बांधलेली आहेत. आमची विनंती आहे, फक्त २०० मीटर अलाइनमेंट बदला. आमचा रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे. आमचा आग्रह राहिल कि, रिंग रोड व्हावा. मात्र आमची विनम्र विनंती आहे की, गरीब कष्ट करणाऱ्या लोकांच्या घरावरून रस्ता काढू नये. हिंजवडीमध्ये ट्राफिक होतं, त्यामुळे अनेक रस्ते रखडलेले आहेत. यावर छोटे छोटे सोल्युशन्स आहेत. डीपी रखडल्यामुळे अजून पुढे उशिराने होणार आहे. ट्राफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते. आमची पीएमआरडी आणि पीएमसीला विनंती आहे की, त्यांनी एकत्र येऊन हे काम करावे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करुन पुणेकरांची ट्राफिकची समस्या मांडली आहे.
ही लोकशाही नाही तर दडपशाही
भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना कॉंग्रेसमधील नेत्यांना व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा सल्ला दिला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जायचा हक्क आहे. मात्र ज्या पद्धतीने ईडी, सीबीआय महाराष्ट्रात हे राजकारण चाललंय ते दुर्दैवी आहे. याला लोकशाही म्हणत नाहीत, याला दडपशाही म्हणतात,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीमध्ये निधी वाटपावरुन राजकारण सुरु आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी नाही पाहत, दुसऱ्याच्या घरात मी कशाला पाहू. महाराष्ट्रात खूप मोठी आव्हाने आहेत. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. सरकारचे काम बघा अनेक पेमेंट्स अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी किंवा निदान मालाला हमीभाव व्यवस्थित मिळत नाही आहे. महाराष्ट्रात क्राईम वाढत आहे. दुर्दैवाने १०० वर्षात राज्यात फार काही क्रांती झालेली दिसत नाही. हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि राज्य सरकारचा डेटा आहे,” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.