मोठी बातमी ! शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाने बजावली नोटीस(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधीवरुन वाद सुरु असल्याचे समोर आले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केले आहेत. सामाजिक न्याय खाते सांभाळत असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी निधीबाबत भेदभाव केला असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदिती तटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला. यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्डमध्ये देखील आदिती तटकरे यांच्या खात्याचा सर्वोत्कृष्ट खाते म्हणून नंबर आला आहे. यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की, “कोणत्याही खात्यावर अन्याय होता कमा नये. जर हा पैसा अशा पद्धतीने गेला, तर काही योजना ठप्प होतील. आत्ताच माझं जवळपास 3 हजार कोटी देणं आहे. मुख्यमंत्रीसाहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की, तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा. जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याच आश्वासित करा. तसं पत्र त्यांना दिलेलं आहे. अजितदादांना सुद्धा बोललो आहे. बजेट विधिमंडळात पास केलं, म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये. तुम्ही देतानाच परिपूर्ण द्या, म्हणून त्यांच्यावर आक्षेप आहे,” असे स्पष्ट मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले. संजय शिरसाट म्हणाले की, “लाडकी बहिण योजनेमुळे सरकार आलं. त्यावर आक्षेप घेण्याच कारण नाही. या पद्धतीने पैसे कमी करु नका. इतर अनेक मार्ग आहेत. लाडकी बहिण योजनेच सरकारवर थोडसं बर्डन आहे हे सर्व मान्य करतात. ही योजना बंद होऊ नये. पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची धारणा आहे. आमदाराला निधी कमी, जास्त देणं हा भाग वेगळा आहे. पण खात्याला वर्गीकरण करुन पैसे दिले जातात. तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात, ते बंधनकारक आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भात फाईल माझ्याकडे आलेली. आपण या खात्यातून दलित, अल्पसंख्यांकांना सुविधा देत आहोत. आदिवासी विभाग वेगळा आहे. आपण माझ्या खात्यातून पैसा कट करु नये असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे,” असे स्पष्ट मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भले कर्ज काढावं लागेल तरी…
संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनीमामा केला असल्याची चर्चा आहे. याबाबत शिरसाट म्हणाले की, अजित पवारांवर राग आहे का? हे शकुनी मामा कोण? हे जे कोणी प्रश्न निर्माण करतायत, त्याच्याशी काही देणघेणं नाही. मी त्या भागडीत पडत नाही. मी माझ्या खात्यापुरता पाहतो. राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे. लाडकी बहिण योजनेत 1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा वेगळ्या अर्थाने बाऊ करतात. योजना बंद करणार का? आमची जी कमिटमेंट आहे, ती पूर्ण करणार. राज्यावर आर्थिक भार आला आहे. भले कर्ज काढावं लागेल. 1500 रुपये मिळणार एवढं नक्की,” असं विधान महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.