
Devendra Fadnavis
मुंबई : MPSC ची त यारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे.
बैठकीनंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी MPSC संदर्भात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक असल्याचं म्हटलं. “विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच आहे. बऱ्याच गोष्टी साचत गेल्या,” असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी फडणवीस यांनी यापूर्वी ज्या गोष्टी वेळेत व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नसल्याचंही मान्य केलं. आता विद्यार्थ्यांचा आवाज समोर आला आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याची संधी मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
MPSC मधील गैरप्रकारांबाबत विद्यार्थ्यांकडे पुरावे असतील तर सरकार कारवाई करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “तुमच्याकडे पुरावा असेल तर आम्ही कारवाई करायला तयार आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली. रिचेकिंग, चौकशी, SIT यांसह विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर सरकार सकारात्मक असून, संबंधित कारवाया पुढील आठ दिवसांत करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या पेपरचं रिचेकिंग करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या मुलाखतीही पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
आता पुढील MPSC परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यावर सरकारचा भर असेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच व्ही. राधा समितीसमोर आपले मुद्दे मांडण्यास सांगण्यात आलं आहे. RTI संदर्भातील पेपर मिळण्याच्या अडचणींबाबतही मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
एकूणच MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मोठी पावलं उचलण्याची तयारी दिसत असून, आता पुढील आठ दिवसांत प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.