
mpsc student
Pune MPSC Student Suicide: पुण्यातील नारायण पेठ परिसरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षांची कसून तयारी करत होता.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सततची आर्थिक टंचाई आणि डोक्यावर झालेला कर्जाचा भार यामुळे प्रथमेश नैराश्यात होता. पुण्यातील राहत्या खोलीचे भाडे थकले होते, तसेच खाण्यापिण्याचा खर्च आणि अभ्यासाचा ताण वाढत असल्यामुळे त्याने ओळखीच्या लोकांकडून उसनवारी केली होती. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याने स्पर्धा परीक्षा सोडून गावी परतण्याचा विचारही काही जणांजवळ बोलून दाखवला होता.
घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट (चिठ्ठी) देखील सापडली आहे. यामध्ये त्याने स्वतःच्या आर्थिक अडचणींचा आणि घेतलेल्या कर्जाच्या व्यवहारांचा सविस्तर उल्लेख केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण भागातून पुण्यात अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या होतकरू तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. गेल्या काही काळात पेपरफुटीसह विविध गैरप्रकार होत असल्याने एक स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डावलल्याची भावना निर्माण होत असून यातूनच त्यांची वर्षानुवर्षे केवळ परीक्षा देण्यातच जातात. त्यातच कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळं आईवडील मुलांना शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाहीत.
Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC
अशा वेळी लाखो विद्यार्थी उधार-उसनवार करुन पुण्यासारख्या शहरात अभ्यास करतात, पण परिस्थितीमुळं हे पैसे परत करता न आल्याने आर्थिक ताण वाढतो आणि स्वाभिमानालाही ठेच लागते मग यातूनच ते आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांची तातडीने एमपीएससीतून हकालपट्टी करुन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची राख केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबालाही भरीव आर्थिक मदत द्यावी, असं रोहित पवार म्हणाले.