
मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,उल्हासनगरात महायुतीचाच महापौर
मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता आणि २०१९ पासून अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उबाठाने प्रकल्प रोखून धरले. कोविड काळात भ्रष्टाचार केला. २०२२ मध्ये महायुती सरकारने सगळे अडथळे दूर केले. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम हाती घेतले. मुंबईची दुर्देशा केल्यानेच जनतेने निवडणुकीत त्यांचा पराभव केला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा हा भगव्या रंगाचा आहे आणि तो भगवाच राहणार, असे ते म्हणाले. मुंब्रा ठाणे जिल्ह्यातच आहे, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.
मनसेने कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनेस महायुतीसोबत होती. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना व भाजप महायुती म्हणून निवडणूक लढले आणि महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करु, असे ते म्हणाले. दोन चार महापालिका वगळ्यास बहुतांश ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
आमची विचारधारा बाळासाहेबांसोबत आहे. शिवसेना भाजप युती ही बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजी पासून आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजीपर्यंत सुरु आहे. २०१९ मध्ये शिवसेना भाजप युतीला बहुमत असताना बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करुन ज्यांनी सरकार बनवले ते जनमत विरोधी होते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. विरोधकांचे खूप प्रेम असल्याने त्यांना उठता, बसता आणि स्वप्नात मी दिसतो, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. बदलापूरमधील घटना दुर्देवी असून आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवसेना भाजप ही विकासासाठी युती आहे, त्यांच्यासारखी एखाद्याला खडड्यात घाल, दुसऱ्याला वरकाढ अशी युती नाही. निवडणुकीत युती करुन त्यांनी दुसऱ्याला खड्ड्यात घातले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा अजेंडा सत्ता आणि खुर्चीचा नाही, त्यामुळेच मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला, असे ते म्हणाले.