
राधानगरी तालुक्यात हाय व्होल्टेज राजकीय लढती
नामदार हसन मुश्रीफ यांना जोरदार धक्का
ए. वाय. पाटील काँग्रेसच्या बाजूने
भोगावती: राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रचंड चुरशीच्या ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांनी तालुक्यातील कसबा तारळे, राधानगरी, वाळवे, सरवडे व राशिवडे या पाचही गटांमध्ये थेट काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. या घडामोडींमुळे नामदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने जवळपास पाचही गटांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी संबंधित उमेदवारांना अधिकृत ए. बी. फॉर्म वितरित केले. यावेळी काँग्रेसचे पी डी धुंदरे,धीरज डोंगळे,सदाशिवराव चरापले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यामुळे महाविकास आघाडीची निवडणूक तयारी पूर्णत्वास गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य
दुसरीकडे महायुतीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात अद्यापही जागावाटपावर एकमत झालेले नाही. या अंतर्गत मतभेदांचा थेट फायदा महाविकास आघाडीला होत असल्याचे दिसून येत आहे. ए. वाय. पाटील यांच्या राजकीय पाठिंब्यामुळे राधानगरी तालुक्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कसबा तारळे गटाबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्याने या गटातील राजकीय उत्कंठा वाढली आहे. तालुक्यातील पाचही गट व दहा गणांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार असून, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती.
Kolhapur ZP Election: 23 लाख कोल्हापूरकर ठरवणार उमेदवारांचे भविष्य; जिल्हा परिषद अन्…
एकूणच राधानगरी तालुक्यातील ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तासंघर्ष न राहता, जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रत्येक जिल्हा परिषद गटात महायुती मध्ये वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत.राजकीय नेते मंडळींमध्ये गुप्त बैठका आणि फोनवरून जोडण्या मोठ्या गतीने सुरू झाल्या आहेत. दरम्यान आज मोठ्या गर्दीने राष्ट्रवादी अजित पवार गट मार्फत अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.