
ncp Mla Dilip Walse Patil declare Local Body Elections in shirur
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणूका पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मात्र अजित पवार गटाचे आमदार आणि बडे नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट निवडणूकीच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. आंबेगाव-शिरुर येथील एका सभेमध्ये त्यांनी भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी तरुण-तरुणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यामुळे राजकीय नेत्यानेच निवडणूका जाहीर केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
शिरुरमधील मेळाव्यामध्ये आमदार दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “२०१७ साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २०२२ मध्ये पुढच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. परंतु, राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे या निवडणुका तीन वर्षे पुढे ढकलल्या गेल्या. दरम्यानच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी जी तयारी केली होती ती वाया गेली,” अशी खंत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, “आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की वाट्टेल त्या परिस्थितीत ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत.” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
प्रत्येक उमेदवार हा घड्याळांचा
“येत्या दोन-तीन दिवसांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असतील तर आपल्याला तयारी करावी लागेल. येथील स्थानिक निवडणुकीत १७ प्रभाग आहेत. त्यामुळे आपल्याकडून १७ लोकांना संधी मिळणार आहे. नगराध्यक्षांची निवड होणार आहे. सर्वांनाच संधी मिळणार नाही. ज्याला संधी मिळेल तो आपल्या पक्षाचा उमेदवार असेल. प्रत्येक उमेदवार हा घड्याळांचा (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उमेदवार आहे हे लक्षात ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे.” असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
१५ जानेवारीला त्यासाठीच मतदान
यापुढे त्यांनी निवडणूकांच्या थेट तारखा सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे नगरपंचायतीच्या निवडणुका चालू असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. साधारणपणे १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होईल. त्याआधी नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. १५ जानेवारीला त्यासाठीच मतदान होईल. ३१ जानेवारी पूर्वी सर्व महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन हा निवडणूक कार्यक्रम संपलेला असेल आणि नवीन लोकांच्या हातात सत्ता मिळालेली तुम्हाला दिसेल.” असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी थेट निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.