शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाशिकमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Vote Chori in India: नाशिक : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अनेक वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पालिका निवडणुकांचा मुहूर्त लागला आहे. मात्र त्यावर बोगस मतदार याद्यांचे सावट असल्याचे दिसून येत आहे. राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीसह मनस नेते राज ठाकरे यांनी देखील मतदार याद्यांमधील घोळ हा मुद्दा उपस्थित करत विरोधकांसोबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, भाजप हे सर्व आरोप धुडकावून लावत आहेत. मात्र आता भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदार यादी समोर आणल्यामुळे भाजपची गोची झाली आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये वोट चोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर यावरुन जोरदार टीकास्त्र डागले. दोन वेळा थेट पुरावे सादर करत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. मतदार याद्यांमध्ये घरांचे पत्ते, वय आणि एकाच व्यक्तीचे वेगवेगळे राज्यांमध्ये असणारे मतदान यामुळे दाट संशय निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये देखील रान पेटले आहे. याविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाने मिळून चर्चगेट येथे सत्याचा मोर्चा देखील काढला होता. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे समोर आणले आहे. नाशिकच्या कायदा आघाडीचे हर्षल केंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोगस मतदार याद्यांबाबत आवाज उठवला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मतदार याद्यांमधील घोटाळ्याविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित यावे असे आवाहन जेष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वी देखील केले आहे. आता भाजपला दणका मिळाला आहे. कारण शिवसेना एकनाथ शिंदे यांचा नाशिकमधील विभाग मतदार यादी घोटाळ्या संदर्भात एक्शन मोडमध्ये आला आहे. कायदा आघाडीचे हर्षल केंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोगस मतदार याद्यांबाबत अभ्यास आणि संशोधन केले. यानंतर त्यांनी मतदार याद्यांवर गंभीर आरोप केले आहे. मतदार याद्यांमध्ये दुबार आणि बोगस मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. तसेच या सर्व मतदार याद्या संशयास्पद असल्याचा धक्कादायक दावा शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिदि पक्षाच्या कायदा सेलने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील नावे विशिष्ट मतदारसंघात नोंदविणे. मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे दोन ठिकाणी समाविष्ट करणे. असे विविध आक्षेप निवेदनात आहेत. या मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शहरातील चार विधानसभा मतदारसंघात दोन लाख ९८ हजार संशयास्पद आणि दुबार नावे असल्याची सप्रमाण तक्रार त्यांनी केली आहे. यामध्ये देवळाली मतदारसंघात ८६ हजार तर नाशिक पश्चिम मतदार संघात ९३ हजार ५१७ संशयास्पद नावे असल्याची तक्रार आहे. शहरातील मतदार संघाच्या यादीत समाविष्ट बोगस आणि संशयास्पद नावे तातडीने वगळावेत या संदर्भात मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावे. संबंधित त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.






