ncp sharad pawar group take action against gopichand padalkar controversial statement on jayant patil
Gopichand Padalkar : मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे जोरदार चर्चेमध्ये आले आहेत. गोपीचंद पडळकर हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली. जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचे नाव घेत गोपीचंद पडळकर बरळले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादीने पत्र जारी केले असून आपला राग व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याबाबत थेट पत्रक काढून भाजपवर जहरी टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या पत्रामध्ये लिहिण्यात आले आहे की, “आपल्या महाराष्ट्राला एक उदात्त राजकीय संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आदरणीय शरद पवार साहेबांपर्यंत आणि स्व. आचार्य अत्रे, एस. एम. जोशींपासून ते स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आपल्या सर्व टोलेजंग नेत्यांनी एक अशी राजकीय संस्कृती जोपासली आहे जिथे विरोध होतो, अगदी टोकाचा संघर्षही होतो. पण ज्यात अभिनिवेश, द्वेषभावनेला काहीही स्थान नाही आणि राजकीय-सामाजिक जीवनात कार्यरत व्यक्तींबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अर्वाच्च भाषेला तर अजिबातच स्थान नाही.”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“परंतु, गेली काही वर्षे ज्यांच्या हाती सत्तेची सूत्र आहेत तिथूनच अर्वाच्च भाषेत बेताल वक्तव्य वारंवार केली जात आहेत किंबहुना मुद्दामहून वाचाळवीर निर्माण केले जात आहेत. जिथे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडले जातात त्या पवित्र विधानभवनात गुंडांना आणून हाणामारी केली जात आहे. ह्या सर्व पराक्रमांकडे मुख्यमंत्री महोदय जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्ष करत आहेत जणू काही सत्ताधाऱ्यांकडूनच अशा महाभागांना पोसलं जात आहे.”
“आता कळस म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, सहकारमहर्षी दिवंगत राजारामबापू पाटील, ज्यांनी महाराष्ट्राचं अर्थखातं, गृहखातं, जलसंपदा खातं सांभाळून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिलं ते जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबियांबद्दल अतिशय अर्वाच्च भाषेत अकलेचे तारे तोडले गेले आहेत. हा महाराष्ट्र मातृसत्ताक संस्कारातून मोठा झालेला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल बोललं गेलं म्हणून जोरदार टीका झाली पण आज मातृसत्ताक महाराष्ट्राच्या भूमीत एका मातेबद्दल अपशब्द वापरले गेले तरीही सत्ताधारी गप्प का?” असा सवाल राष्ट्रवादीने विचारला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“स्व. राजारामबापूंचा आणि आमचे नेते, मातृभक्त जयंतरावांचा केला गेलेला अपमान आम्ही कदापिही सहन करू शकत नाही. आम्ही संयम राखतो, मर्यादा पाळतो म्हणून षंड समजत असाल तर तुम्ही मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहात. आम्ही निश्चित ह्या विकृतीचा प्रतिकार करणार, आणि सर्व शक्तिनिशी महाभागांचे सर्व मनसुबे हाणून पाडणार.”
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, “माझी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी व सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे कि, येत्या सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता, पुष्पराज चौक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ जमू या आणि स्व. राजारामबापूंच्या विचारांसमोर नतमस्तक होऊन… वाचाळवीरांना जशास तसे उत्तर देऊ आणि त्यांना पोसणाऱ्या महायुती सरकारला इशारा देऊ कि, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत हे द्वेषाचं निवडुंग रुजू देणार नाही. आता फक्त प्रतिक्रिया देण्याची वेळ नाही, तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मनगटांतील ताकद एकत्रित दाखविण्याची वेळ आहे,” असे म्हणत आंदोलनाची घोषणा केली आहे.