गोपीचंद पडळकर यांनी जयं पाटलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Gopichand Padalkar Controversial statement : मुंबई : राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यामध्ये मागे नाहीत. नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचे देखील नाव घेतले. यामुळे वातावरण तापले असून विरोधी नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त टीकेवर आता सत्तेमध्ये असणारे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी त्यांनी भाजप पक्षाला जोरदार खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार म्हणाले की, आमचं महायुतीचं सरकार आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या किंवा त्यांच्या संबंधित व्यक्तींच्या काही चुका असतील, तर भाजपाने त्याची नोंद घेतली पाहिजे. त्यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमच्या पक्षात असं काही घडलं तर आम्ही नोंद घेतली पाहिजे किंवा शिवसेनेत असं काही घडलं तर एकनाथ शिंदेंनी त्याची नोंद घेतली पाहिजे. पडळकरांच्या विधानाविषयी मला काहीही माहिती नाही. पण मी याच विचारांचा आहे की कुणी कुठल्याही पक्षाचा असला, तरी महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, संस्कृती आहे. प्रत्येकानं बोलताना, वागताना कुणाला दुखावणारी विधानं करू नये, समाजात सलोखा आणि चांगले वातावरण राहील असाच प्रयत्न सगळ्यांनी करायला हवा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जयंत पाटील यांच्याबाबत अतिशय चुकीची भाषा वापरल्यानंतर शरद पवार यांनी देखील पाऊले उचलली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जेष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला असल्याचे सांगितले जात आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत चर्चा केली असून नाराजी व्यक्त केली आहे. अशी गलिच्छ टीका करणं योग्य नाही, या शब्दांत शरद पवारांनी देखील देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे. तसेच गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आहे, असे देखील शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना फोनवर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
“अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे? एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले असून कारवाईची मागणी केली जात आहे.