
राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
वेणुगोपाल संपूर्ण आंदोलनाचे रणनीतिकार म्हणून काम पाहत आहेत. दुपारच्या जेवणाच्या बैठकांपासून ते राजघाट मोर्चापर्यंतच्या संपूर्ण नियोजन प्रक्रियेवर ते देखरेख करतात आणि दैनंदिन आंदोलनाचे मार्गही तेच ठरवतात. त्यांच्यापाठोपाठ, राज्यसभा खासदार आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक व्यवहार समितीचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी हे या आंदोलनाचा आवाज आहेत. इम्रान खान दररोज आंदोलनस्थळी सर्वांत आधी पोहोचतात, कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण करतात आणि व्यासपीठाची सूत्रे हाती घेतात.
प्रसारमाध्यमे आणि कथानकाच्या आघाडीवर, काँग्रेसचे संचार प्रमुख पवन खेरा, ज्येष्ठ नेते जयराम रमेश, मणिकम टागोर, राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुडा हे नेतृत्व करत आहेत. पोलिसांच्या एफआयआरला आणि भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यापासून ते पत्रकार परिषदा आणि टीव्हीवरील चर्चासत्रांपर्यंत, हे नेते सातत्याने पक्षाची भूमिका मांडत आहेत आणि सरकारला कैचीत पकडत आहेत.
देवेंद्र यादव यांचीही महत्त्वाची भूमिका
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी राहुल गांधींच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कनॉट प्लेस आणि राजघाट येथे हजारो लोकांच्या जमण्यामागे त्यांची टीम असल्याचे मानले जाते. तरुण आणि महिलांमध्ये, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या आंदोलनाचा नवा चेहरा म्हणून उदयास आल्या आहेत. संसदेतील मतचोरीच्या मुद्द्यावरील त्यांचे भाषण आणि महिला कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरची त्यांची उपस्थिती यांचा तरुणांवर मोठा प्रभाव पडला आहे, ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेलेत
राहुल गांधींच्या या नव्या टीमचा उदय हा एका मोठ्या राजकीय फेरबदलामुळेही झाला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक आणि वैचारिक राजकारणाशी जुळवून घेऊ न शकलेल्या काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आता पक्षापासून स्वतःला दूर केले आहे. त्यांच्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे गुलाम नबी आझाद, जे एकेकाळी सोनिया गांधीच्या जवळचे होते, पण जी-२३ नंतर त्यांनी पक्ष सोडला. त्याचप्रमाणे, जितीन प्रसाद, आरपीएन सिंग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आता भाजपमध्ये असलेले ज्योतिरादित्य शिंदे, हे राहुल यांच्या ‘रस्त्यावरील लढाई ‘व्या मॉडेलमुळे अस्वस्थ होते.
पडद्यामागे रणनीती हाताळणारे चेहरे
या नवीन कोअर टीममध्ये असे अनेक चेहरे आहेत जे कॅमेऱ्यासमोर कमी दिसतात, पण पडद्यामागे अधिक सक्रिय आहेत. यामध्ये मीडिया टीमची भूमिका आहे. विनीत पुनिया, संजीव सिंग, मनोज त्यागी, सुप्रिया भारद्वाज, प्रमोद रावत, प्रखर सिंग, अरुण त्रिपाठी, नितीन सारस्वत, विवेक सिंग, गिरीश कुमार आणि रचना कपूर यांच्यासारखे लोक आंदोलनाला धार देण्यासाठी काम करत आहेत.