राहुल गांधी पुन्हा ताब्यात; जंतरमंतरकडे जाताना दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई (Photo - Social Media)
Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीच्या खासदारांसह जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी जात असताना दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या इतर खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीचे जवळपास २०० खासदार जंतरमंतरकडे निघाले होते. मात्र, जंतरमंतर मैदानापासून सुमारे १०० मीटर अंतरावरच पोलिसांनी तीन बस अडवल्या.
पोलिसांनी आंदोलनाला जाण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. प्रियंका गांधीही यावेळी रस्त्यावर बसल्या. आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी आंदोलनावर ठाम राहिले.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर प्रियंका गांधी आणि इतर खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आपल्यासह इतर खासदारांना मारहाण केल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी आकाशवाणी भवनजवळ तब्बल आठ तास ठिय्या मांडला. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.
यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमानंतर खासदार तीन बसमधून जंतरमंतरकडे निघाले होते.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच इंडिया आघाडीने SIR प्रक्रियेबाबतही काही मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि SIRच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.






