Rohit Pawar aggressive on Rahul Solapurkar controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. इतिहासामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आग्रा सुटकेबाबत त्यांनी वक्तव्य केल्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून यावरुन अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
आग्रा सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्थ विधान केले. ते म्हणाले की, “शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते” असा दावा त्यांनी केला. “मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून महाराजांनी सही-शिक्क्याचे पत्र घेतले होते आणि त्या परवान्याच्या आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.” तसेच, “स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते, याचीही पुरावे उपलब्ध आहेत,” असा उल्लेख राहुल सोलापूरकर यांनी केला. यावरुन नवीन वाद उफाळला असून यावरुन रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. रोहित पवार म्हणाले की, “अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी पुढे म्हणाले की, “महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही…” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 4, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरुन आमदार छगन भुजबळ हे देखील आक्रमक झाले आहे. भुजबळ म्हणाले की, “या लोकांना वेड लागलंय का? शिवाजी महाराज मोठ्या सफाईने सुटले. स्वराज्य निर्माण केलं. त्यांची सुटका ही हुशारी आणि रणनीतीचा भाग होता. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सोबत आले असते तर संकट आलं असतं. संभाजी महाराजांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडलं होतं. त्याविषयी मॉसाहेब जिजाऊ यांनी विचारलं होत हा इतिहास आहे,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.