
MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारी (११) छत्रपती संभाजीनगर शहरात आक्रोश मोर्चा काढला. आमखास मैदानापासून सुरू झालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. त्यानंतर दिल्लीगेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. वर्ग ‘क’ची परीक्षा नोव्हेंबरमध्येच घेण्यात यावी, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, तसेच मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
यावेळी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थी नेत्यांनी, एमपीएससीच्या कारभाराबाबतच्या आपल्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनीही जात-पात, पक्ष आणि संघटनांचे मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा दिल्यास त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन पवार यांनी केले.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यापूर्वी पुण्यात, छत्रपती संभाजीनगर येथे दोनदा, सोलापूर, सातारा येथे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. उद्या (शनिवारी) लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
अनेक प्रकरणांमध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली मात्र वर्षानुवर्षे कारवाई झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, माझ्याकडे काम नाही म्हणून मी पेपरफुटीवर बोलतो, अशी टीका केली जाते. मात्र सरकारनेच काही परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचे मान्य केले आहे. वर्ग ‘क’ची परीक्षा पुढे ढकलावी लागली, हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली.