
sangli water meeting
सांगली : सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण? सांगलीच्या हक्काच्या पाण्यावर निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून सांगलीचे पाणी अडवले जात असल्याने कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. तरीही सांगलीवरच उपसाबंदी आणि वीजजोडण्या बंद करण्याची वेळ का? अशा संतप्त सवालांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कालवा समितीची बैठक चांगलीच गाजली. (Sangli News)
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. मंत्री जयकुमार गोरे ऑनलाइन उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या वाट्याचे पाणी मिळत नसल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका बाजूला सांगली जिल्ह्यात पाणी उपशावर निर्बंध लादले जात असताना सातारा जिल्ह्यात मात्र वीजपुरवठा आणि पाणी उपसा सुरू असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. सांगलीच्या हक्काच्या पाण्याबाबत दुजाभाव का, असा सवाल करत आमदारांनी प्रशासन आणि जलसंपदा विभागाला धारेवर धरले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी, ‘दरवेळी आमचे पाणी अडवले जाते. सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला. खासदार विशाल पाटील यांनीही सातारा जिल्ह्यात पाणी उपसा सुरू असताना सांगलीत उपसाबंदी का, असा प्रश्न उपस्थित केला. पाणी सांगलीच्या हक्काचे असताना त्याच्या वापरासाठी दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून का राहावे लागते, असा मुद्दा त्यांनी मांडला.
मंत्री शंभूराजे देसाई हे ऑनलाइन उपस्थित राहून आपण पाणी अडवले नसल्याचे स्पष्ट केले. गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणातील पाणीसाठा कमी असल्याचे सांगत समन्यायी पाणीवाटपाची भूमिका त्यांनी मांडली. मात्र, सांगलीतील नदीपात्र कोरडे पडले असताना पाणी सोडण्याचे अधिकार नेमके कुणाकडे आहेत आणि सांगलीला वेळेत पाणी का मिळत नाही, या प्रश्नांवरून बैठकीतील राजकीय वातावरण तापले.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सांगलीच्या हक्काचे पाणी मिळण्याची गरज अधोरेखित केली. आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी दुष्काळी भागातील पाणी नियोजन, म्हैसाळ व टेंभू योजनांचे आवर्तन आणि वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
सांगलीचे पाणी, साताऱ्याचा हस्तक्षेप आणि प्रशासनाचे नियोजन यावरून लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. केवळ बैठका घेऊन आणि आश्वासने देऊन प्रश्न सुटणार नाही; सांगलीच्या नदीपात्रात प्रत्यक्ष पाणी सोडण्याची गरज आहे, अशी भूमिका आमदारांनी मांडली. त्यामुळे आता जलसंपदा विभाग या आक्रमक मागण्यांवर काय निर्णय घेतो आणि सांगलीला हक्काचे पाणी कधी मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे गंभीर आरोप
Ans: सांगलीच्या वाट्याचे पाणी मिळत नसल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. सांगलीत उपसाबंदी आणि वीजजोडण्यांवर निर्बंध असताना सातारा जिल्ह्यात पाणी उपसा सुरू असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.
Ans: सांगलीचे पाणी अडवण्याचा अधिकार कोणाला दिला, असा संतप्त सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. सांगलीच्या हक्काचे पाणी वेळेत मिळावे, अशी त्यांची मागणी होती.
Ans: सांगलीच्या नदीपात्रात पाणी सोडणे, म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजनांचे आवर्तन वेळेत करणे आणि वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देणे, अशा मागण्या लोकप्रतिनिधींनी केल्या.