
Sanjay raut
Sanjay Raut : देशाच्या राजकारणात सध्या निवडणूक आयोग आणि मतदारयादीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने रामलीला मैदानावर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांची तातडीने गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
इंडिया आघाडीच्या आंदोलनावर बोलताना संजय राऊत यांनी १९७४ मधील जयप्रकाश नारायण यांच्या लोकशाही बचाव आंदोलनाची आठवण करून दिली. कालची रॅली त्या आंदोलनापेक्षाही मोठी होती, असा दावा त्यांनी केला.
संविधान आणि लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांनी केलेलं आवाहन महत्त्वाचं असल्याचंही राऊत म्हणाले. भाजपला रामलीला मैदानावरील गर्दी दिसत नाही, असा टोला लगावत त्यांनी आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगितलं.
मतदारयादीतून कोट्यवधी मतदारांची नावे हटवण्याच्या मुद्द्यावरून राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. हटवण्यात आलेल्या मतदारांना बांगलादेशी घुसखोर म्हटलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी अमित शाहांना थेट सवाल केला. १३ कोटी मतदारांना बांगलादेशी म्हणत असाल, तर बांगलादेशची लोकसंख्या १५ कोटी असताना एवढे लोक भारतात आलेच कसे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
राऊत पुढे म्हणाले, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घुसखोर आले असतील, तर ती केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी आणि अपयश आहे. त्यामुळे मोदींनी अमित शाहांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत, या अमित शाहांच्या विधानावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींना पंतप्रधान करायचं की नाही, हे देशातील जनता ठरवेल; अमित शाह नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणीही राऊतांनी पुन्हा केली. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट मोदी सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष बनला आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तातडीने मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Ans: हटवण्यात आलेल्या मतदारांना बांगलादेशी घुसखोर म्हटलं जात असल्याच्या दाव्यावर राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. बांगलादेशची लोकसंख्या 15 कोटी असताना साडेतेरा कोटी लोक भारतात आले कसे, असा सवाल त्यांनी केला.
Ans: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत संविधान व लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीने आंदोलन केलं.