(Photo - X)
Sanjay Raut : देशातील आणि विशेषतः राज्यातील राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर आल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे विरोधकांनी वोटाचोरीचा मुद्दा उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रान पेटवले आहे. सत्ताधारी मात्र विरोधकांवर जोरदार निशाणा साधत देशात अराजकता पसरवण्याचे गंभीर आरोप करत आहेत. अश्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी INDIA आघाडी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत चीनकडून फंडिंग मिळत असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत चीनच्या फंडिंगच्या गोष्टी नंतर करा, आधी देशाच्या सीमेकडे लक्ष द्या, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं. गेल्या काही दिवसांपासून भारत – चीन सीमेवर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे चर्चा रंगू लागल्या आहेत.
ठाण्यातील सभेत फडणवीसांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर चीनच्या फंडिंगवरून निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, चीनच्या फंडिंगचं नंतर बघू, आधी अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये चीनच्या हालचालींकडे लक्ष द्या. चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी भाजपला चांगलंच सुनावलं. नेपाळमध्येही चीनचा प्रभाव वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. देशाच्या सीमांबाबत बोलण्याऐवजी फंडिंगच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात असल्याची टीका त्यांनी केली.
NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!
इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील रॅलीत महाराष्ट्रातील नेत्यांना भाषणाची संधी मिळाली नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. यावरही राऊतांनी उत्तर दिलं. रॅलीमध्ये सकाळपासून गर्दी वाढत होती. भाषणं लांबत होती आणि गर्दीचा रेटा स्टेजपर्यंत पोहोचत होता. त्यामुळे राहुल गांधींना आपलं भाषण लवकर संपवावं लागलं, असं राऊत म्हणाले. याचवेळी भाजपला टोला लगावत ते म्हणाले, भाजपने महाराष्ट्राची एवढीच चिंता केली असती तर शिवसेना फोडली नसती.
भाजपच्या प्रतिरॅलीवरही संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीका केली. मोदींच्या विरोधात लाट उसळली असून भाजपला देशात नेमकं काय सुरू आहे, याची जाणीव नसल्याचं ते म्हणाले. यावेळी राऊतांनी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरही गंभीर राजकीय टीका केली. त्यांच्यावर खटले चालतील आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल, असा दावाही त्यांनी केला.
एकूणच चीन फंडिंगच्या आरोपावरून सुरू झालेला हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.
Ans: ठाण्यातील लोकशाही बचाव रॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना चीनकडून फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला.
Ans: चीनच्या फंडिंगचा मुद्दा बाजूला ठेवून आधी लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील चीनच्या हालचालींकडे लक्ष द्या, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
Ans: भाजपने महाराष्ट्राची एवढीच चिंता केली असती तर शिवसेना फोडली नसती, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.






