
Sanjay Raut: '...दम नाही तर कशाला...', संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
Sanjay Raut: ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पूर्णेकर यांचा जुना सहकारी पप्या शिंदे याला अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. पोलिसांनी त्यांचा पुरवणी जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
याच दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. ही क्लिप मीनाक्षी शिंदे यांची असल्याचा दावा राऊत यांनी केला असून, त्यातील कथित धमकीच्या भाषेचा संदर्भ देत त्यांनी शिंदे यांच्या अटकेची मागणी केली आहे. ही क्लिप आणि त्यासंदर्भातील राऊत यांचे आरोप सध्या राजकीय वादाचा विषय ठरले आहेत.
ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे. त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा; ठाण्याचे पोलीस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे, पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय! हिची अटक कधी होणार? ठाण्याचे “बीड ” झाले आहे. या लेडी डॉन ला कोण वाचवतेय? पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय? अमित शहा ने कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र? ठाणेकरांनो जागे व्हा; बोला , व्यक्त व्हा, रस्त्यावर उतरा! जय महाराष्ट्र!
ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे
त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा;ठाण्याचे पोलिस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे,
पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय!
हिची… pic.twitter.com/qolJaQvJNX — Sanjay Raut (@rautsanjay61) October 1, 2026
दुसरीकडे, मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून तपासातून जे निष्पन्न होईल ते समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे. पालिका निवडणुकीपासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे हत्या प्रकरणातील आरोप आणि कथित ऑडिओ क्लिपची सत्यता याबाबत अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात राजकीय वातावरण तापले असून त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे.