
'...हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील 'नॉर्वेकर'; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काफायक बातमी समोर आली असून, यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अश्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खात्याला लक्ष्य केले आहे. “पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन आहे,पण सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही,” अश्या शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “प्रिय देवेंद्रजी, जय महाराष्ट्र! पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन आहे,पण सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही. १८ जणांची कुटुंब उघड्यावर पडली. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे, सरकारचे लोक पोलिसांना लव जिहाद,हिंदू मुसलमान वाद,ईद च्या कुरबान्या अशा राष्ट्र सेवेत गुंतवून ठेवतात व मग अशी सामुदायिक हत्या कांड घडतात! याला जबाबदार कोण? राज्यात सर्वच स्तरांवर कायद्याचे राज्य संपले आहे! आता एवढेच करा, विषारी दारू विकणारे आणि पिऊन मेलेले हिंदूच आहेत. तेंव्हा जे मेले त्यांच्या कुटुंबियाना २५ लाख रुपये नुकसान भरपाई द्या आणि विषारी दारू विक्रेत्यांना तुमच्या प्रख्यात वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करून पक्ष वाढीस जुंपा! जय महाराष्ट्र,” अश्या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला आहे.
प्रिय देवेंद्रजी
जय महाराष्ट्र
पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन आहे,पण सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही,
१८ जणांची कुटुंब उघड्यावर पडली,
हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे,
सरकारचे लोक पोलिसांना लव जिहाद,हिंदू मुसलमान वाद,ईद च्या कुरबान्या अशा… pic.twitter.com/efIrtpWAJj — Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विषारी दारू कुठे तयार झाली ते शोधून काढले आहे. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.
Pune News : पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल होणार तर सिंहगड किल्ल्याजवळ…
हडपसर येथील काळेपडळ येथे अत्यंत सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे हा या विषारी दारूचा अड्डा चालवत होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती. ही दारू त्याने हडपसर आणि फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली. ही दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. काही तासांतच एकापाठोपाठ एक अशा १८जणांचा मृत्यू झाला.योगेश वानखेडे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. या घटनेमुळे दारू बनवत असलेल्या ठिकाणचे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वानखेडे प्रशासनाच्या डोळ्यांदेखत एवढा मोठा विषारी दारूचा अड्डा चालवतोच कसा? केमिकल स्पिरिटचा बेकायदेशीर पुरवठा त्याच्यापर्यंत पोहोचतोच कसा? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.