
'वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल'; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
मेढा / दत्तात्रय पवार : जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असतानाच बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा शहरातील दहीहंडी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांना सूचक इशारा देत जोरदार राजकीय डरकाळी फोडली. “जंगल शांत आहे, याचा अर्थ जंगलात वाघ नाही असं समजू नका. वाघ झोपला आहे. जागा झाला तर भारी पडेल,” अशा शेलक्या शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून,जावळीच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
मेढा शहरातील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. याच कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या भाषणातून तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर भाष्य केले. मेढा नगरपंचायत निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूकीचा उल्लेख त्यांनी एक निवडणूक वर खाली झाली म्हणून हवेत जाऊ नका म्हणत ‘तुम्ही दोन हात कराल तर आम्हीही चार करू’ असा सूचक इशारा या निवडणुकीत ज्यांनी उड्या मारल्या. त्या सर्व विरोधकांना त्यांनी दिला. तसेच आगामी जिल्हा बँक निवडणुकीत तालुक्यात विविध राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न करू पाहणाऱ्यांना राजेंचे हे सूचक वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
शिवेंद्रसिंहराजेंच्या डरकाळीने विरोधी गटात शांतता
जावळीतील राजकारणात अलीकडच्या काळात अनेक राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे पुन्हा तालुक्यात एन्ट्री करू पाहत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अंकुश बाबा कदम यांची तालुक्यातील राजकीय सक्रियता चर्चेत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी मेढ्यातून ही डरकाळी फोडली.बाहेरून येऊन जावळीच्या राजकारणात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत इशारा दिला.“एखादी निवडणूक वर-खाली झाली म्हणून भ्रमात राहू नका,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. एका निवडणुकीतील निकालावरून स्वतःची ताकद वाढल्याचा गैरसमज करून घेऊ नये, असा सूचक संदेशही त्यांनी दिला.
‘जावळीच्या जनतेच्या मनात ‘राजेच’ आहेत आणि कायम राहतील’
जावळीच्या राजकारणात कोणीही कितीही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला, तरी जावळीतील जनतेच्या मनात शिवेंद्रसिंहराजे यांचे स्थान कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तालुक्यात नव्याने राजकीय पाय रोवू पाहणाऱ्यांना त्यांच्या वक्तव्यातून थेट संदेश मिळाला आहे.’बाहेरून येऊन वैयक्तिक टीका करून मोठे होण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आणि आमचा संयम पाहत असेल, तर तुम्ही दोन हात कराल तर मी चार हात करीन,” असा सूचक इशारा त्यांनी व्यासपीठावरून दिला आहे. त्यामुळे विरोधी गटात चांगलीच शांतता पसरलेली पाहायला मिळत आहे.
राजे समर्थकांचे वाढले मनोबल
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शांत संयमी राजकारण करणारे म्हणून ओळखले जातात. मात्र, अलीकडच्या राजकीय घडामोडी पाहता तालुक्याच्या राजकारणात अनेक जण एन्ट्री करू पाहत आहेत. त्यामुळेच शिवेंद्रसिंहराजेंनी अशा विरोधकांना थोपवण्यासाठी डरकाळी फोडली. त्यांच्या या आक्रमक शैलीने डरकाळीमुळे जावळी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचे व राजे समर्थकांचे मनोबल चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहे.
PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका