
‘शिवसेना शिंदेंचीच’; सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद,
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आता सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्यच असल्याचा दावा केला. या निर्णयातून संविधानाचं कोणतंही उल्लंघन झालेलं नाही, असंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याआधी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. विधिमंडळातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. हाच मुद्दा कौल यांनी जोरदारपणे खोडून काढला.
कौल यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी शिवसेनेतील अनेक आमदार आणि खासदारांनी त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. ही वेगळी राजकीय भूमिका म्हणजेच पक्षातील राजकीय फूट असल्याचं कौल यांनी सांगितलं.
याशिवाय निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचाही दावा त्यांनी केला. पक्षात दोन स्वतंत्र गट निर्माण होणं एवढ्यावरच राजकीय वाद ठरत नाही. आमदार आणि खासदार वेगळी भूमिका घेत असतील, स्वतंत्र बैठका घेत असतील आणि वेगवेगळे ठराव करत असतील, तर त्यातून पक्षातील अंतर्गत संघर्ष स्पष्ट होतो, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
शिवसेनेच्या पक्षघटनेवरही कौल यांनी कोर्टात भाष्य केलं. ‘पक्षप्रमुख’ हे पद 2018 मध्ये निर्माण झालं, हा दावा चुकीचा असून हे पद 2013 मध्येच अस्तित्वात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच संविधानातील कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला व्यापक अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, निवडणूक आयोगासमोर जाण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र ठराव, बैठका आणि परस्पर अपात्रतेच्या मागण्या केल्या होत्या. त्यामुळे हा केवळ विधिमंडळातील वाद नसून त्याची व्याप्ती संपूर्ण राजकीय पक्षापर्यंत पोहोचली होती, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.