
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी निवडणूक लढणार
भाजपने अपेक्षित जागा न दिल्याने घेतला निर्णय
सांगली महापालिका निवडणुकीत येणार रंगत
सांगली: राज्यात निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळी राजकीय स्थिती पाहायला मिळत आहे. सांगलीत देखील निवडणूक रंगतदार होणार आहे. मात्र सांगलीत भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने सांगली महानगरपालिकेत निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे काही जागांची मागणी केली होती. भाजपकडे उमेदवारी मागून देखील सन्मानजनक जागा न मिळाल्याने श्री शिवप्रतिष्ठान धारकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सांगलीत भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हिंदुत्ववादी नेते आक्रमक झाले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपकडे धारकऱ्यांसाठी काही जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत होती. मात्र भाजपने केवळ एकच जागा दिल्याने धारकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर येत आहे.
Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?
सांगली महानगरपालिकेत भाजपने सन्मानजनक जागा दिल्या नसल्याने धारकरी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे. सांगलीत एका धारकऱ्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे समोर आले आहे. सांगलीत संभाजी भिडे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी सांगलीत मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र आता संभाजी भिडे यांचे धारकरीच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने भाजपला अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजप-शिंदेंचे ठरले
राज्यात निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात मुंबई महानगरपालिका सर्वात महत्वाची निवडणूक असल्याचे समजले जात आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंची युती अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप ठरल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेत 207 जागांवर शिवसेना-भाजपचे एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटामध्ये निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. उर्वरित काही जागांवर तोडगा निघेल असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. काही जागांबबत बोलणी सुरू असल्याचे समोर आले आहे. अंतिम जागावाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतील असे म्हटले जात आहे.