
Suvendu Adhikari CM
कोलकाता : साधू-संत आणि ऋषीमुनींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे. कोलकात्यातील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या ११ हजार लोकांच्या गीता पठण कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी गीता पठण, हनुमान चालिसा आणि धार्मिक उपक्रमांबाबतही त्यांनी भूमिका मांडली.
‘साधू-संत-महंतांचा अपमान केल्यास तुरुंगात जावं लागेल’, असं अधिकारी यांनी म्हटलं. याआधी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दुर्गापूजेच्या काळात मांसाहारावर केलेल्या वक्तव्यामुळे बंगालमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यांच्या फोटो जाळल्याच्या घटनेनंतर सुवेंदू अधिकारी यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिल्याचं वृत्त आलं होतं. या प्रकरणात काँग्रेसचे कोलकाता पदाधिकारी अतनू दास यांना अटक झाली होती.
याच पार्श्वभूमीवर नेताजी इनडोअर स्टेडियममधील कार्यक्रमात अधिकारी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘आता काळ बदलला आहे, भीती बाळगण्याची गरज नाही,’ असा संदेश त्यांनी दिला. गीता वाचा, हनुमान चालिसेचं पठण करा, हरे कृष्ण मंत्राचा जप करा, शंख वाजवा, असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.
यावेळी अधिकारी यांनी आपल्या सरकारला ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’ असं संबोधलं. गोमातेचं संरक्षण करण्यासाठी सरकार असल्याचंही त्यांनी म्हटलं. धार्मिक श्रद्धा व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी घाबरू नये, असा त्यांचा संदेश होता.
दरम्यान, २९ डिसेंबर रोजी कोलकात्यात १० लाख लोकांच्या उपस्थितीत गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं अधिकारी यांनी सांगितलं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटो जाळण्याच्या घटनेचा उल्लेख करत अधिकारी यांनी यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. दरम्यान, या वक्तव्यांमध्ये त्यांनी त्यांच्या सरकारची धार्मिक-सांस्कृतिक भूमिका मांडत विरोधकांवरही टीका केली.
Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा