
Tejasvee Ghosalkar name in disguised as a potential BMC mayor women open category
सर्वात जास्त चर्चेत असणारी आणि श्रीमंत असणाऱ्या बीएमसीवर कोण महापौर होणार याची जोरदार चर्चा झाली. मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार यावरुन राजकीय वादंग निर्माण झाला. तसेच मुंबई पालिकेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महायुतीमधील कोणत्या महिला नेत्या महापौर पदाचा कारभार सांभाळणार याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या महिला नगरसेविकांचे देखील नाव घेतले जात आहे.
हे देखील वाचा : मुंबईत महिला राज! BMC मध्ये सर्वसाधारण महिला महापौर आरक्षण सोडत जाहीर
मुंबई पालिकेच्या महिला नगरसेविकांमध्ये चर्चेत असणाऱ्या नगरसेविका म्हणजे तेजस्वी घोसाळकर. मुंबईतील दहीसर येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर निवडून आल्या आहेत. त्या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत निवडून आळ्या आहेत. मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी विजय मिळवला. त्याआधी शिवसेनेत होत्या. पण मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपत प्रवेश करुन विजय मिळवला. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर या सक्षम नगरसेविका भाजपकडे आहेत.
ही नावे आहेत चर्चेत
त्याचबरोबर योगिता सुनील कोळी यांनी भाजपच्या तिकीटावर मालाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांचं नाव महापौर पदासाठी चर्चेत आले आहे. त्याचबरोबर राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे आणि शितल गंभीर या महिला नेत्यांची नावे देखील मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी चर्चेत आली आहेत. त्यामुळे कोणती महिला मुंबईवर राज करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा : आरक्षण सोडतीवरुन पेटलं रान! BMC आरक्षणावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप
मुंबई महापालिकेत यंदा एकूण 130 महिला नगरसेविका निवडून आल्या. यामध्ये भाजपकडे 89 पैकी 49 महिला नगरसेविका आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 65 पैकी 38 महिला नगरसेविका आहेत. मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार म्हणून आम्ही चर्चेतली दोन नाव नमूद केली असली, तरी भाजपकडे पालिका प्रशासनाच्या कारभाराचा दीर्घ अनुभव असलेल्या अनेक महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.