Shiv Sena leader Rajan Salvi left Thackeray group and join shinde group
नवी मुंबई : राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जात असणाऱ्या राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राजन साळवी यांनी काल (दि.12) ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे. याबाबत आता राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. राजन साळवी यांनी नाराज नसल्याचे सांगितले होते. मात्र ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता राजन साळवी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विरोधकांनी तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्यामुळे राजन साळवी शिंदे गटामध्ये जाणार असल्याची टीका केली. यावर आता राजन साळवी यांनी स्वतः प्रत्त्युत्तर दिले आहे. शिवसेना ठाकरे गट सोडण्याचे खरे कारण त्यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजन साळवी यांनी नवी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माध्यमांनी पक्ष का सोडला याचे कारण विचारले. याबाबत मत मांडताना ठाकरे गट सोडण्याचे कारण सांगताना सांगितले की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं,” असे थेट नाव घेऊन राजन साळवी यांनी आपले पक्ष सोडण्याचे कारण सांगितले आहे. यावर आता विनायक राऊत काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची आत्तापर्यंत सातव्यांदा चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांनाही या चौकशीसाठी ‘एसीबी’ने नोटीस बजावली आहे. यामुळे चौकशी टाळण्यासाठी पक्षप्रवेश केला जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मत मांडताना राजन साळवी म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो, त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही, आताही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेल आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेल. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा आरोप होत असतात. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत, अशा मोठ्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित वाटत नाही,” असे स्पष्ट मत राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे.