भास्कर जाधव यांनी आपल्या नाराजीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं, याचा मला अभिमान आहे. उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भास्कर जाधव यांनी राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या प्रवेशावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘राजन साळवी हे नेहमी ‘मी एकमेव निष्ठावान’ म्हणायचे. स्वतःच स्वतःला एखादी बिरुदावली लावतो, सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटतं. नंतर विषय चेष्टेचा होतो. हा निष्ठावान ही बिरुदावली तुम्हाला लावावी का? हे राजन साळवींना विचारा. राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही? तिथे विरोध कोणी केला? हे देखील माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच आता सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहित नाही. पण आता हे स्वागत आहे की, त्यांना कबड्डी-कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे? हे येत्या काळात दिसेल’.
याशिवाय, उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर. आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं, याचा मला अभिमान आहे. जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे.
उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू
उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जात आहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे वळविलं जातंय, दबाव आहे. केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे, एवढं होऊनही उद्धव ठाकरे खचले नाहीत, हात टेकले नाहीत. त्यामुळे झोप उडाली आहे, अभी भी टायगर जिंदा है, ही भीती त्यांच्या मनात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.