फोटो सौजन्य- istock
घरोघरी बाप्पाचे थाटामाटात आगमन झालेलं आहे. आता सर्व महिलांची तयारी सुरु झाली आहे ती ज्येष्ठा गौरी आगमनाची. वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळेल. यंदा मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होईल.
ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे. गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण, गणेशोत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते. तीन दिवस हा सण साजरा केला जातो.
ज्येष्ठा गौरी आवाहन आगमन वेळ
यंदा मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवार, 11 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल.
हेदेखील वाचा- गणेश विसर्जनाच्या वेळी ‘हा’ छोटासा उपाय करा, तुमचे नशीब चमकण्याची शक्यता
गौरी आवाहन शुभ मुहूर्त
मंगळवार 10 सप्टेंबर रोजी सूर्योद्यापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असेल. तसेच या दिवशी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहू काळ असेल. गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल. 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी अनुराधा नक्षत्र समाप्ती होईल.
ज्येष्ठा गौरी आवाहन कसे करावे
घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणावेत. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करावी. या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.
हेदेखील वाचा- स्कंद षष्ठी कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत, मंत्र
ज्येष्ठ गौरी आवाहनाचे महत्त्व
या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती, असे मानले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहत स्वागत होते. यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मळातात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते.