छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत (Photo Credit- X)
शहरातील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी विभागीय पातळीवर समन्वय बैठका घेतल्या जात आहेत. पंपिंग यंत्रणेतील दोष दूर करणे, वीजपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणे आणि गळती नियंत्रणावर भर देण्यात येत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वीजबिघाडामुळे नियोजनावर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
याआधी पंधरा दिवसांपूर्वीही वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाण्याचे वेळापत्रक बिघडले होते. त्यावेळी दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाणीप्रवठा करावा लागत होता. महापौर समीर राजूरकर यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत पाण्याचा गॅप कमी करण्याचा आराखडा सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर काही भागांत सुधारणा दिसून आली होती. चिकलठाणा, मुकुंदवाडी, जय विश्वभारती कॉलनी आणि गुरूगणेशनगर परिसरात बारा दिवसांच्या ऐवजी आठ दिवसांच्या अंतराने पाणी देण्यास सुरुवात झाली होती.
मात्र शनिवारी सकाळी जायकवाडी येथील नवीन पंपगृहाचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यानंतर यंत्रणेत सलग बिघाड वाढत गेला. रविवारी मध्यरात्री सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पंपिंग सुरू करण्यात आले आणि पहाटे जलकुंभात पाणी पोहोचले. दरम्यान, शनिवारी शहरात एकाही भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. सर्व भागांना एकाचवेळी पाणी देणे शक्य नसल्याने दोन दिवसांनी टप्पे पुढे ढकलण्यात आले आहेत. शहराततील पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी तांत्रिक पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश






