फोटो सौजन्य- chatgpt
आपल्या देवाऱ्यात अनेक धार्मिक फोटोस, मूर्ती, ग्रंथ, पुस्तके असतात. हे सर्वच आपल्या आजी आजोबांनी, आईवडिलांनी आत्मियतेने जपलेले असतात. यामागे त्यांच्या भावस्पर्शी आठवणी असतात. त्यांची श्रद्धा आपणही जपतो. पण बदलते हवामान, जागेची कमतरता, काही वर्षांनी ते काळानुरूप जीर्ण होतात. अशा अवस्थेत त्यांना जपणे, सांभाळून ठेवणे अवघड होते. त्यामुळे त्यांना भावपूर्ण, विधीयुक्त निरोप देणे आवश्यक असते. पण ते कसे देणार हे समजत नसते. पण डोंबिवलीत असा निरोप देऊ शकता. घरातील भग्न किंवा वापरात नसलेल्या देवतांच्या मूर्ती आणि धार्मिक वस्तूंच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी रविवार, ९ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत विशेष संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया
श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या घरात जुन्या, भग्न किंवा पूजेत वापरात नसलेल्या देवतांच्या मूर्ती, फोटोफ्रेम्स, धार्मिक पुस्तके आणि इतर पूजासाहित्याचे काय करावे, असा प्रश्न प्रत्येक धार्मिक श्रद्धाळूंना पडत असतो. अशा धार्मिक वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता यावी आणि त्यांचा सन्मान कायम राखता यावा, या उद्देशाने श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली आणि विधिवत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात खालील धार्मिक वस्तू संकलित केल्या जाणार आहेत.
पूजेत वापरात नसलेल्या किंवा भग्न झालेल्या देवी-देवतांच्या मूर्ती
देवतांची चित्रे व फोटोफ्रेम
राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा
पूर्वजांच्या फोटोफ्रेम
धार्मिक पुस्तके
देवघरातील वस्त्रे, देव्हारे आणि इतर धार्मिक साहित्य
आयोजकांच्या माहितीनुसार, संकलित करण्यात आलेल्या मूर्ती आणि फ्रेम्स यांचे त्याच ठिकाणी गुरूजींच्या हस्ते विधिवत उत्तरपूजा केली जाईल. त्यानंतर या वस्तू Recycling किंवा Reuse प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतील. त्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखत पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.
नोंदविलेल्या वस्तूंचेच संकलन केले जाईल. पण यासोबत निर्माल्य किंवा अन्य प्रकारचा कचरा स्वीकारला जाणार नाही.तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे फायबर किंवा पीओपी (Plaster of Paris) मूर्ती आणि फ्रेम्स स्वीकारल्या जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
तारीख: रविवार, ९ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी १० ते दुपारी २
श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व) संपर्क: ९०८२४ ११०५४ आणि श्रीमारुती मंदिर, पं. दीनदयाळ मार्ग, डोंबिवली (प.) संपर्क: ९९१९४ ११०५४ या दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले आहे.
पहिल्या १ किलोपर्यंत – २२०
त्यानंतर प्रत्येक १०० ग्रॅमसाठी – २५
धार्मिकतेसोबत पर्यावरण संवर्धन
धार्मिक वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण यांचा तर समतोल साधण्यास मदत होते. त्यामुळे घरात पडून असलेल्या भग्न किंवा वापरात नसलेल्या धार्मिक वस्तूंचा सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Ans: जुन्या किंवा भग्न देवमूर्ती, देवतांचे फोटो व फोटोफ्रेम, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा, पूर्वजांच्या फोटोफ्रेम, धार्मिक पुस्तके, देव्हारे, वस्त्रे आणि इतर पूजासाहित्य जमा करता येईल.
Ans: हा उपक्रम रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
Ans: जुन्या आणि भग्न धार्मिक वस्तूंना सन्मानपूर्वक निरोप देतानाच धार्मिक भावना आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.






