
फोटो सौजन्य-गुगल
वसुबारस (गोवत्स द्वादशी) या सणाशी संबंधित दोन मुख्य पौराणिक आणि पारंपरिक कथा सांगितल्या जातात. पहिली कथा विश्वाची निर्मिती आणि समुद्रमंथनाशी जोडलेली आहे, तर दुसरी कथा ही महाराष्ट्रात घरोघरी पूजल्या जाणाऱ्या ‘कहाणी वसुबारसेची’ या व्रताशी संबंधित आहे. या कथा काय आहेत. त्यात काय सांगितले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊयात.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी अमृताचा शोध घेण्यासाठी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून १४ रत्ने बाहेर पडली. या रत्नांपैकी एक म्हणजे ‘कामधेनु’ नावाची दैवी गाय होती. कामधेनु ही दिव्य आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली गेली. देवांनी ही गाय सप्तऋषींना दिली आणि पुढे ती वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आली. पुढे याच कामधेनू वरून विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यात द्वंद्व झालं होतं.
समुद्रमंथनातून ५ कामधेनु उत्पन्न झाल्याचे मानले जाते, त्यापैकी ‘नंदा’ नावाच्या धेनूला (गायीला) उद्देशून वसुबारसचे हे व्रत केले जाते. या दिवशी गायीच्या शरीरातून विष्णूरूपी चैतन्य लहरी प्रक्षेपित होत असतात, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून मानवजातीसाठी तिच्या उपकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
महाराष्ट्रात वसुबारसच्या दिवशी महिला जी पारंपरिक कहाणी वाचतात किंवा ऐकतात, ती एका सासू आणि सुनेची आहे. ही कथा खूप रंजक आणि संदेश देणारी आहे.
एका आटपाट नगरात एक गरीब कुणबी कुटुंब राहत होते. त्यांच्याकडे ‘कपिला’ आणि ‘शामळा’ नावाच्या दोन गायी आणि त्यांची ‘गव्हाळ’ व ‘मुगाळ’ नावाची दोन लहान वासरे होती. एकदा आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी सासू शेतात काम करण्यासाठी जाताना सुनेला म्हणाली, “आज द्वादशी आहे, मी शेतातून येईपर्यंत घरात ‘गव्हाळे-मुगाळे’ (म्हणजे गव्हाचे आणि मुगाचे दाणे/पदार्थ) शिजवून ठेव.” पण नवीन सुनेला सासूच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. तिने धान्याऐवजी ‘गव्हाळ’ आणि ‘मुगाळ’ नावाच्या त्या दोन्ही वासरांना मारून त्यांचे मांस शिजवले. आणि मोठा अनर्थ घडला..
सासूचा शोक आणि प्रार्थना संध्याकाळी सासू शेतातून परतली आणि तिने सुनेला विचारले, “स्वयंपाक केला का? आणि वासरे कुठे आहेत?” तेव्हा सुनेने घडलेला प्रकार सांगितला. सासूला प्रचंड धक्का बसला. गोवंश हत्या झाल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली. तिने देवाचा धावा केला आणि प्रार्थना केली, “हे देवा, जर संध्याकाळी गायी परत आल्यावर ही वासरे जिवंत झाली नाहीत, तर मी माझे प्राण देईन.”
संध्याकाळी जेव्हा गायी चरून परतल्या, तेव्हा देवाच्या कृपेने ती दोन्ही वासरे जिवंत झाली आणि नेहमीप्रमाणे बागडू लागली. गायींनी आनंदाने आपल्या वासरांना चाटायला सुरुवात केली. हे पाहून सासूच्या जीवात जीव आला.
या चमत्काराची आणि आनंदाची आठवण म्हणून सासूने मनोभावे गाय आणि वासराची पूजा केली. तेव्हापासून आपल्या मुलाबाळांना उदंड आयुष्य मिळावे, घरातील गोधन सुरक्षित राहावे आणि घरात लक्ष्मीचा वास व्हावा म्हणून वसुबारस हा सण साजरा केला जाऊ लागला.
या कथेतील सासू-सुनेच्या प्रसंगावरूनच वसुबारसच्या दिवशी काही विशेष नियम पाळले जातात:
या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रिया आहारात गहू आणि मूग यांचे पदार्थ खात नाहीत.
काही घरांमध्ये या दिवशी गायीचे दूध, दही, तूप किंवा सुरीने कापलेले पदार्थ खाणे टाळले जाते.
व्रताच्या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. त्यामुळे या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
Ans: समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या कामधेनू गायीची कथा आणि सासू-सुनेची पारंपरिक व्रतकथा या दोन कथा सांगितल्या जातात.
Ans: महाराष्ट्रातील काही पारंपरिक व्रतपरंपरांमध्ये सासू-सुनेच्या कथेशी संबंधित श्रद्धेमुळे या दिवशी गहू आणि मूग खाणे टाळले जाते.