हिंदू शास्त्रानुसार जन्मपत्रिकेत चंद्र ग्रहाचं स्थान खूप महत्वाचं आहे. प्रत्येक ग्रहाचा काहीना काही प्रभाव माणसाच्या आयुष्यावरल होत असतो. असाच परिणाम होतो ते चंद्र ग्रहाचा. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्राचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिकतेवर होतो. मन आणि भावना या चंद्राचं प्रतिक मानलं जातं. हाच चंद्र जेव्हा पत्रिकेत बलवान असतो किंवा कमजोर असतो तेव्हा काय प्रभाव होतो ते जाणून घेऊयात.
पत्रिकेतील बलवान चंद्र असलेल्या व्यक्तीचा स्वभाव सौम्य, संवेदनशील आणि समजूतदार असतो. अशा लोकांचा भावनिक समतोल चांगला असतो, त्यामुळे ते तणावाखाली असले तरी शांत आणि संयमी राहतात. त्यांच्या विचारसरणीत स्पष्टता असते आणि निर्णय घेताना ते गोंधळात पडत नाहीत.
पत्रिकेत चंद्र जर शुभ स्थानी असेल तर मन:शांती आणि स्थिरता लाभते. शुक्राप्रमाणे चंद्रालादेखील सौंदर्याचा कारक मानलं जातं. त्यामुळे चंद्राच्या प्रभावाखाली असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तेज असतं. ही मंडळी शांत स्वभावाची असतात. त्यांच्याकडे इतर लोक नैसर्गिकरित्या ओढले जातातत्यामुळे अशा लोकांची लोकप्रियता आणि सामाजिक संवाद अधिक चांगला असतो.
बलवान चंद्र मातृत्वाचेही प्रतीक आहे. त्यामुळे आईशी चांगले संबंध, तिचे प्रेम व आशीर्वाद, आणि घरगुती सुख मिळते. चंद्र जलतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन टिकते, पचनक्रिया नीट राहते, आणि झोप समाधानकारक असते.
शुभ स्थितीत असेल तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकास होतो. काही वेळा, असे लोक लेखक, कवी, कलाकार किंवा मानसशास्त्रज्ञ होण्याकडे झुकतात.बलवान चंद्र पत्रिकेत असेल, तर व्यक्ती जीवनात स्थिरता, प्रेम, समजून वागत आयुष्य जगते. यासाठी चंद्र शुभ राहणं हे मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं.
याऊलट पत्रिकेत चंद्र खराब असल्यास बोलण्यात स्पष्टता नसणं. संवाद साधण्याचा अभाव तसंच सतत तणावाखाली राहणं यासारख्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. कमजोर चंद्रामुळे फक्त मानसिकच नाही शारीरिक व्याधी सुद्धा निर्माण होतात. सतत सर्दी असणं, किंवा डोकं दुखणं ही कमजोर चंद्राची लक्षणं आहेत. म्हणून पत्रिकेतील चंद्र बलवान करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही सोपे उपाय देखील सांगितले आहेत.
जर सतत मानसिक नैराश्य येत असेल तर, ओम सों सोमाय नम: या मंत्राचा जप केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात.
चंद्रदेव आणि महादेवांचा संंबंध खूप घट्ट आहे. त्यामुळे चंद्रबळ वाढवण्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी तुम्ही प्रसाद म्हणून महादेवांना खीर अर्पण करु शकता. चंद्र हा आईशी असलेलं नातं स्पष्ट करतो. चंद्रबळ वाढवण्यासाठी तुमच्या घरातील आईसमान व्यक्तींचा सन्मान करा. प्रत्येक पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात फिरल्याने देखील याचा सकारात्मक परिणाम होतो.