चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल
मिताली सोनावणेने आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अपघाताचा प्रसंग उलगडला. अवघ्या पाच वर्षांच्या असताना हा अपघात घडला होता. अपघात घडण्यापूर्णी मितालीच्या परीक्षेचा निकाल लागला होता आणि ९७ टक्के गुण मिळाले होते. याचदरम्यान मिताली नातेवाईकांच्या घरी गेली असताना, घरात गरम पाण्याशी संबंधित काम सुरू असताना मिताली जिन्यावरून खाली उतरत होती. खाली उतरत असताना मितालीच्या हातात खेळणी आणि काही वस्तू होत्या. अचानक गरम पाणी पायावर पडले अन् मितालीचा तोल गेला आणि मिताली खाली पडली. या दुर्घटनेत गरम पाणी मितालीच्या शरीरावर सांडले आणि ती गंभीररीत्या भाजली. या घटनेनंतर तिच्या आयुष्यात उपचार, वेदना आणि शारीरिक बदलांचा कठीण प्रवास सुरू झाला.
अपघातानंतरच्या दिवसांबद्दल बोलताना मितालीने सांगितले की, उपचारांच्या काळात तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र, ती लहान असल्याने या जखमा आयुष्यभर आपल्या शरीरावर राहू शकतात, याची सुरुवातीला पूर्ण कल्पना नव्हती. उपचारानंतर तिने स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा तिच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. आपण जिवंत आहोत, घरी परतलो आहोत, ही जाणीव तिच्यासाठी सर्वांत महत्त्वाची होती.या जखमा आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासह आपल्याला पुढे जायचे आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन मितालीने विकसित केला.
मितालीच्या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःचा स्वीकार. अपघातामुळे शरीरावर उमटलेल्या खुणा लपवण्यापेक्षा तिने त्या त्यांच्यासह आत्मविश्वासाने जगण्याचा मार्ग निवडला. स्वतःच्या शरीराविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि इतरांच्या सौंदर्याच्या निकषांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, यावर भर दिला. मितालीच्या मते, स्वतःला स्वीकारणे ही आत्मविश्वास निर्माण करण्याची पहिली पायरी आहे. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःकडे कोणत्या नजरेने पाहतो, हे अधिक महत्त्वाचे आहे.
मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्य, त्वचा, शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्त्व यांसंबंधी अनेक अपेक्षा असतात. मात्र, या अपेक्षांमध्ये स्वतःला बसवण्याऐवजी मितालीने स्वतःचे वेगळेपण स्वीकारले.बर्न सर्व्हायव्हर म्हणून आलेल्या अनुभवांनी तिचा आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला नवी दिशा दिली. सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य रूप नसून आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि स्वतःला स्वीकारण्याची ताकद असल्याचा संदेश आपल्या प्रवासातून दिला. मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना तिने शरीरावरील जखमांना आपल्या प्रगतीतील अडथळा मानले नाही.
मितालीने पॉडकास्टमध्ये सोशल मीडियावरील अनुभवांबद्दलही भाष्य केले. सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रकार वापरले जात असले, तरी तिने कृत्रिम पद्धतीने फॉलोअर्स वाढवण्याला विरोध दर्शवला. तिच्या म्हणण्यानुसार, सुमारे १२ हजार फॉलोअर्स असून ते खरे आहेत. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी फॉलोअर्स विकत घेण्याची गरज वाटत नाही, असं मितालीने सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगशी संबंधित शिक्षण घेतल्याचेही सांगितले. तंत्रज्ञानाची माहिती असूनही सोशल मीडियावर कृत्रिम लोकप्रियता निर्माण करण्याऐवजी खऱ्या प्रेक्षकांशी जोडलेले राहण्याला त्या प्राधान्य देतात.
मितालीने आपल्या कामामागील उद्देश स्पष्ट करताना एक महत्त्वाचा विचार मांडला. हजारो लोकांनी आपले काम पाहण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रवासातून प्रेरणा मिळाली, तरी ते अधिक समाधानकारक असल्यासारखं आहे. केवळ लोकप्रियता मिळवणे हा उद्देश नसून स्वतःच्या अनुभवातून इतरांना सकारात्मक संदेश देणे महत्त्वाचे असल्याचे मितालीने स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेकदा ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. मितालीलाही प्रतिक्रिया येतात. मात्र, त्याकडेही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. शंभर सकारात्मक कमेंट्समध्ये एखादी नकारात्मक कमेंट असली, तरी ती लक्ष वेधून घेते. मात्र, अशा प्रतिक्रियांमुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये, असे मत तिने व्यक्त केलं. नकारात्मक कमेंट्स येणे हेदेखील आपले काम अधिक लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे एक लक्षण असू शकते. अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याला महत्व द्या, अशी भावना मितालीने व्यक्त केली.
मितालीच्या प्रवासात कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. आपल्या आईसह जवळच्या व्यक्तींचा उल्लेख केला. आयुष्यातील कठीण प्रसंगांमधून पुढे जाताना कुटुंबाचा आधार आणि स्वतःवरील विश्वास यांचे महत्त्व त्यांच्या संवादातून अधोरेखित झाले.
नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव मानला जातो. याच पार्श्वभूमीवर नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमध्ये मिताली सोनावणेने प्रवास उलगडण्यात आला.वयाच्या पाचव्या वर्षी झालेल्या अपघातानंतर शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शरीरावरील जखमांपेक्षा स्वतःची जिद्द, क्षमता आणि आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून मिळतो. मिताली सोनावणेची कहाणी ही केवळ एका बर्न सर्व्हायव्हरची किंवा सुपरमॉडेलची यशोगाथा नाही, तर स्वतःला स्वीकारून समाजाच्या सौंदर्याच्या ठरावीक चौकटींपलीकडे जाण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.






