Kunal Kamra controversy Should comedy have limits
मुंबई : अलीकडच्या काळात केवळ चर्चेत राहण्यासाठी अगोचरपणा केला जातो. कोणाचे पाठबळ असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या स्वातंत्र्यावर अथवा प्रतिष्ठेला बाधा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थट्टा करणे स्टैंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला अडचणीचे ठरलेले दिसते. शिंदे समर्थकांच्या रोषाचा सामना मात्र मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओला करावा लागला. रविवारी सायंकाळी शिवसैनिकांनी एका हॉटेलमध्ये तोडफोड केली, तर सोमवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्टुडिओचा काही भाग पाडला. गेल्या काही दिवसांत एकट्या महाराष्ट्रात स्टैंडअप कॉमेडियन जमात गोत्यात येण्याची ही तिसरी घटना आहे.
हे देखील वाचा : कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावर योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याला…”
यातील अगोदरच्या एका प्रकरणात एका अभिनेत्याची गंमत केल्याबद्दल कॉमेडियनवर हल्ला झाला होता, तर दुसरे एक इंडियाज गॉट लेटंट प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. अगोदरच्या दोन प्रकरणांपेक्षा कामराचे प्रकरण काहीसे वेगळे आहे. त्याने विद्यमान राजवटीतील एका मोठ्या नेत्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मत मांडण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाही आदी मुद्दे चर्चेला आले आहेत व त्याची चर्चा होतच राहील. या पलीकडे जाऊन आणखी एक विषय आता चर्चेला येणे आवश्यक आहे की कॉमेडी करणाऱ्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडावी का? त्यांना वैगुण्यावर बोट ठेवण्याचा अधिकार निश्चतच दिला आहे व त्याचा ज्याच्यात धाडस असेल त्यांनी वापर केलाही पाहिजे. मात्र, असे व्यक्तिगत हल्ले करण्यामागे कोणता अंतस्थ हेतू आहे का? एका गाजलेल्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याचे विडंबन कामराने सादर केले. त्याने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसले, तरी रोख त्यांच्याकडेच होता.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे यांच्या गटावर मूळ पक्षातील नेत्यांकडून ज्या शब्दांचा वापर करत गेले दोन-तीन वर्षे हल्ला केला जातो आहे त्या शब्दांचा वापरही केला गेला व त्यामुळे शिंदेंच्या समर्थकांनी भडकणे स्वाभाविक होते. तोडफोड झाली, महापालिकेकडून कारवाईही झाली. स्टुडिओनेही कामराच्या व्हिडीओतील विचारांचे आम्ही समर्थन करत नाही.
असे नमूद करत बिनशर्त आणि मनापासून माफी मागितली तली आहे. राजकीय पटलावर हा विषय हॉट ठरला आहे तद्वतच सोशल मीडियावर यासंदर्भातील बाजू आणि प्रतिबाजू मांडणाऱ्यांच्या पोस्टरचा महापूर आला आहे. थोडक्यात, अशा घटना घडल्यानंतर जे जे होणे अपेक्षित असते ते सगळे होते आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री यांनीही कामराचा निषेध केला असून माफी मागावी असे त्याला सुनावले आहे, तर शिंदेंनी ज्या पक्षाला भगदाड पाडून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते त्या मूळ पक्षाच्या प्रमुख मंडळींनी उघडपणे कामराचे समर्थन केले आहे.
हे देखील वाचा : Yogesh Kadam on Kunal kamra: ‘कुणाल कामराचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतयं’; योगेश कदम
हा वाद इतक्यात थांबणार नाही. कामरा यानेही अगोदर न्यायालयाने आदेश दिले, तर माफी मागू असे म्हटले होते. नंतर त्याने पुन्हा घुमजाव केल्याचे समजते. याचा अर्थ त्याला आता भय नसल्याचे त्याने सूचित केले आहे. त्यामुळेच याला कोणी सुपारी दिली का किंवा कसला लाभ दिला गेला आहे का या चर्चानाही जोर आला आहे. त्याचा त्याने इन्कार केला आहे. लोकशाहीत भाषणस्वातंत्र्य आहे. तसेच जो स्थिरावला असतो आणि त्यामुळे काहीसा बेफिकीरही असतो त्याला डिवचण्याचा अधिकारही माध्यमांना असतो. त्यामागे व्यापक समाजहिताचा हेतू असतो. नवमाध्यमांना मात्र स्वातंत्र्य आणि जबाबदारी यातील लक्ष्मणरेषा ओळखावी लागेल.