फोटो सौजन्य : सोशल मीडिया
नॅशनल सन्स अँड डॉटर्स डे साजरा करण्यात येतो याचे कारण, आज पालक त्यांच्या मुलांना सांगू शकतात की त्यांची मुले त्यांच्यासाठी किती खास आहेत ते. या खास दिनी आई वडील आपल्या मुलांसोबत काही सुंदर क्षण नक्कीच घालवू शकतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या कुटुंबासाठी फारसा वेळच मिळत नाही. पण या दिनानिमित्ताने एकमेकांसोबत वेळ घालवण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे मग सहकुटुंब कुठेतरी बाहेर डीनरसाठी जाण्याचा प्लॅनही उत्तम ठरू शकतो. पण तरीही तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा दिवस नक्की कसा सुरु करण्यात आला आणि काय आहे यामागचा इतिहास? म्हणूनच पहा आजच्या दिवसाचे खास महत्त्व.
मुलांसोबत घालवा निवांत वेळ
या दिनानिमित्त तुमच्या मुलांना कशामुळे प्रेरणा मिळते हे तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यांच्या आशा आणि स्वप्नांबद्दल जाणून घ्या. तुम्ही एकमेकांबद्दल जाणून घेऊ शकता आणि एकमेकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवू शकता. आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्या मुलांसोबत छान असा वेळ घालवता यावा यासाठीही हा दिन साजरा करण्यात येतो. तसेच पालक आणि मुले यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते जपणारा हा आजचा नॅशनल सन्स अँड डॉटर्स डे साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय पुत्र आणि कन्या दिनाचा इतिहास
राष्ट्रीय दिनाच्या कॅलेंडरमध्ये हा दिवस 11 ऑगस्ट रोजी साजरा केल्याचा सर्वात जुना रेकॉर्ड 1988 मध्ये सापडला. 12 ऑगस्ट 1988 च्या नानाईमो (ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा) डेली न्यूजच्या लेखात याचा उल्लेख आहे. 20 ऑगस्ट 1944 रोजी सेंट जोसेफ न्यूज-प्रेस/गॅझेटमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, जे. हेन्री ड्यूसेनबेरी यांनी 1936 मध्ये राष्ट्रीय पुत्र आणि कन्या दिनाची कल्पना प्रथम मांडली होती. असा दिवस का साजरा करत नाही असे एका मुलाने विचारल्यानंतर ड्यूसेनबेरी यांना ही कल्पना सुचली. त्यांच्या प्रयत्नातून हा दिवस मिसूरीमध्ये सुरू झाला आणि त्यांनतर जगभरात सर्वत्र पसरला. परदेशात हा दिवस साजरा करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. पालक त्यांच्या प्रत्येक मुलासाठी एक फूल फुलदाणीत ठेवतात आणि फुलदाणी घराच्या एका प्रमुख खोलीत ठेवतात. दिवसभर पालक त्यांच्या मुलांबद्दल विचार करतात. विशेषत: जे आता घरी राहत नाहीत आणि शिकण्यासाठी किंवा कामासाठी बाहेर राहायला गेलेले असतात.
1945 पर्यंत हा उत्सव 22 राज्यांमध्ये साजरा करण्यात येऊ लागला. त्यानंतर, 1972 मध्ये, फ्लोरिडाचे काँग्रेस सदस्य क्लॉड पेपर यांनी डेल रिओ, टेक्सासच्या जॉर्जिया पॉलच्या वतीने सन्स अँड डॉटर्स डे स्थापन करण्याची विनंती अर्ज सादर केला. 28 ऑक्टोबर 1972 च्या डेल रिओ न्यूज-हेराल्डनुसार, दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी या घोषणेचे स्मरण केले जाईल. तथापि हा दिवस घोषित करण्यासाठी कोणत्याही विधेयकावर किंवा संयुक्त ठरावावर सभागृहाने किंवा सिनेटने स्वाक्षरी केली नव्हती. पण तरीही हा दिवस सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा करण्यात येतो.