CM Devendra Fadnavis (Photo Credit- X)
Yala Saswad/Sambhaji Mahamuni: रामोशी-बेडर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज आणि उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार गोपीचंद पडळकर, विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक मदतीसोबतच समाजातील तरुणांसाठी पोलीस भरतीकरिता विशेष प्रशिक्षण योजना राबवण्यात येतील. तसेच, शिक्षण आणि प्रशिक्षणाकरिता महाज्योती (Mahajyoti) आणि सारथी (Sarathi) या संस्थांच्या माध्यमातून योजना सुरू केल्या जातील.
याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारले होते, त्याचप्रमाणे सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच सध्याच्या सरकारचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही एका समाजाचे हित साधताना दुसऱ्या समाजाचे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
With every community, building a future where progress touches everyone!
Attended the ‘234th Jayanti Sohala of Adya Krantiveer Raje Umaji Naik’ at Bhiwadi, Purandar, Pune today.
The history of Ramoshi, Berad and Bedar communities is one of courage and sacrifice, marked by their… https://t.co/FlvYmeqMta pic.twitter.com/rHDMrviEW9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 7, 2025
राजे उमाजी नाईक यांच्या शौर्याचे स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे ते खरे क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून ब्रिटिशांना धडा शिकवला. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी १० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते, तरीही त्यांनी अन्यायाविरुद्धचा लढा सुरू ठेवला. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी पुरंदर येथे पाच एकर जागेत राजे उमाजी नाईक स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री व विविध महामंडळे अस्तित्वात आली. महाज्योतीसारख्या संस्थेमुळे अनेक वंचित घटकांतील तरुण तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वैमानिक होऊ शकले.
आमदार पडळकर यांनी मनोगतात राज्य शासनाने इतर मागासांसाठी केलेल्या कामांची माहिती सांगून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे स्मारक होत असल्याचे आणि आता पुरंदर येथे राजे उमाजी नाईक यांचे पाच एकरमध्ये स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगितले.
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रास्ताविकात रामोशी-बेडर समाजाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रामोशी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपटही दाखविण्यात आला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री स्व. गिरीश बापट, माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे, स्व. रामभाऊ जाधव, स्व. सुनील चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार, तर बाबुराव जमादार, छगन जाधव व बाबुराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाने उभ्या केलेल्या कक्षाला भेट देऊन राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.