Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली 'ही' शिवी (Photo Credit- X)
Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची आता त्यांच्याच देशात उघडपणे खिल्ली उडवली जात आहे. एका लाईव्ह टॉक शोमध्ये अमेरिकेच्या प्रसिद्ध राजकारण तज्ज्ञाने थेट कॅमेऱ्यावर ट्रम्प यांच्यासाठी एक अपशब्द वापरला आहे. त्यांनी फक्त शिवी दिली नाही, तर ट्रम्प प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही जोरदार टीका केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दक्षिण आशियातील राजकारण आणि लष्करी घडामोडींच्या तज्ज्ञ असलेल्या कॅरोल क्रिस्टीन फेअर (Carol Christine Fair) यांनी पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश पत्रकार मोइद पीरजादा यांच्यासोबत एका मुलाखतीत ट्रम्प प्रशासनाबद्दल आपली मते मांडली.
मुलाखतीत बोलताना क्रिस्टीन फेअर म्हणाल्या, “माझ्या मनातील आशावाद म्हणतो की, सर्व काही नोकरशाही सांभाळून घेईल. पण माझ्या मनातील निराशावाद म्हणतो की अजून फक्त सहा महिने झाले आहेत आणि आपल्याला या ‘चू…या’ला अजून चार वर्षे सोसावे लागणार आहे.”
त्यांच्या तोंडून हा शब्द ऐकून पत्रकार मोइद पीरजादा म्हणाले, “हाच तो शब्द आहे जो मी उर्दूमध्ये नेहमी वापरतो, पण माझे अनेक प्रेक्षक त्यावर आक्षेप घेतात. तुम्ही तो इंग्रजी चर्चेत वापरला आहे.” या शब्दाचे महत्त्व इतके आहे की, तो वापरल्याशिवाय अनेकदा एखादी परिस्थिती समजावून सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.
फेअर यांनी ट्रम्प प्रशासनाची जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी आपापल्या क्षेत्रात फारसे तज्ञ नाहीत. त्यांच्याकडे केवळ एक महत्त्वाची सत्ता आहे. “आपल्याकडे एक गुंतागुंतीची नोकरशाही आहे आणि गेल्या २५ वर्षांपासून ती व्यवस्था संबंध सुधारण्याचे काम करत आहे,” असे फेअर यांनी नमूद केले.
कॅरोल क्रिस्टीन फेअर या जॉर्जटाउन विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत. त्या दक्षिण आशियातील राजकारण आणि लष्करी बाबींच्या तज्ञ मानल्या जातात. त्यांनी ‘रँड कॉर्पोरेशन’ आणि संयुक्त राष्ट्र संघासारख्या संस्थांसोबत काम केले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबा यावर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.