
हेमंत मधुकर शिंदेंची हिप-हॉप संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख
सर्वात मोठा मराठी रॅप करणारा जगभरातला पहिला व्यक्ती
इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सीलेंसने घेतली रॅप ची नोंद
पुणे/गायत्री पवळे: मध्यमवर्गीय कुटुंबातील संघर्ष, शालेय जीवनातील अपमान, आर्थिक अडचणी आणि अपयशी ठरलेल्या अनेक संधी यांवर मात करत हिप-हॉप संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रॅपर हेमंत मधुकर शिंदे यांनी आपल्या जीवन प्रवासाविषयी ‘नवराष्ट्र’शी मनमोकळ संवाद साधला. बालपणापासून हंगामा इंडियन म्युझिक अवॉर्ड्सपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. जगभरातला सर्वात मोठा मराठी रॅप करणारा हा पहिला व्यक्ती ठरला. इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सीलेंस यांनी या रॅप ची नोंद घेतली असून पुरस्काराने पुरस्कृत केले आहे.
तुमच्या बालपणाने आणि कुटुंबाने तुमच्या आयुष्याला कोणती दिशा दिली?
आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. वडिलांनी खूप कष्ट करून इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी मिळवली. लहानपणी आमच्या घरी टीव्ही नव्हता. शेजाऱ्यांच्या घरी मालिका पाहायला जायचो. नंतर आई-वडिलांनी हप्त्यावर टीव्ही घेतला आणि त्यावर एमटीव्हीवरील हिप-हॉप संगीत पाहून रॅप आणि हिप-हॉपची आवड निर्माण झाली.
शालेय जीवनातील कोणता प्रसंग आजही लक्षात राहिला आहे?
नववीत असताना एका शिक्षिकेने संपूर्ण वर्गासमोर ‘तुला दहावी जमणार नाही’ असे सांगितले. तो अपमान मी मनावर घेतला. त्याच अपमानाला प्रेरणा मानून मेहनत केली आणि २००६ मध्ये दहावी उत्तीर्ण झालो. त्या घटनेने माझा आत्मविश्वास वाढवला.
कलाकार म्हणून सुरुवातीच्या काळात कोणती आव्हाने आली? ‘डान्स इंडिया डान्स’, व्ही चॅनल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी माझी निवड झाली होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे परदेशात जाता आले नाही. काही काळ नैराश्य आले, पण हार मानली नाही. स्वतः एडिटिंग शिकलो आणि रॅप गाणी लिहिण्यास सुरुवात केली.
‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
नोकरी आणि संगीताचा प्रवास कसा सांभाळला?
२०१६ मध्ये ॲक्सेंचरमध्ये नोकरी मिळाली. पहिल्या पगारातून मी संगीतासाठी खर्च केला. ‘मुंबईकर’ हे पहिले गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘कहाणी’ ही गाणी प्रदर्शित झाली. श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
पुढील वाटचालीबद्दल तुमची भूमिका काय आहे?
२०२४ मध्ये ‘दुनिया’ हे गाणे हंगामा इंडियन म्युझिक अवॉर्ड्समध्ये टॉप-५ फायनलिस्टपर्यंत पोहोचले. पुरस्कार मिळाला नाही, तरी माझा प्रवास थांबलेला नाही. चांगले संगीत निर्माण करून भारतीय हिप-हॉपला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी मी सातत्याने काम करत राहणार आहे.
CRPF Raising Day: देशाच्या सुरक्षेचा अभेद्य कणा; जाणून घ्या सीआरपीएफचा 87 वर्षांचा गौरवशाली इतिहास
तरुणाई रॅप इंडस्ट्रीला फ्यूचर म्हणून पाहते तर त्यावर तुमचे काय मत आहे?
आज अनेक तरुण-तरुणी रॅप इंडस्ट्रीकडे केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून नव्हे, तर करिअरची संधी म्हणून पाहत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि म्युझिक स्ट्रीमिंगमुळे स्वतंत्र कलाकारांना स्वतःचे संगीत थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. रॅपमधून सामाजिक प्रश्न, वैयक्तिक अनुभव आणि तरुणांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या जातात. मात्र, या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्य, दर्जेदार लेखन, संगीताची जाण आणि व्यावसायिक शिस्त आवश्यक आहे. स्वतःच्या कलेमध्ये भविष्य पाहणे ही खूप मोठी संधी असते.