World Samosa Day : इराणचा 'संबोसा' कसा बनला भारताचा 'समोसा'? जागतिक समोसा दिनानिमित्त जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पावसाळ्यातील गारवा असो, संध्याकाळची चहाची वेळ असो किंवा मित्रांसोबतची गप्पांची मैफल एक गरमागरम आणि कुरकुरीत समोसा ताटात आला की पोटासोबत मनही तृप्त होते. भारतातच नव्हे, तर जगभरातील खवय्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार्या या त्रिकोणी पदार्थाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘जागतिक समोसा दिवस’ (World Samosa Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका स्नॅकचा आनंद लुटण्यासाठी नसून, शतकानुशतके चालत आलेल्या याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि रस्त्यावरील साध्या स्टॉलपासून ते अलिशान तारांकित हॉटेल्सपर्यंत सर्वांना समान आनंदाने जोडतो. मैद्याच्या खुसखुशीत पापुद्र्यामध्ये बटाटे, मटार, कांदे, सुकामेवा आणि खमंग मसाल्यांचे सारण भरून तळलेला हा पदार्थ हिरवी चटणी किंवा चिंचेच्या आंबट-गोड चटणीसोबत खाण्याची मजा काही वेगळीच असते. परंतु, आज भारताची ओळख बनलेला हा समोसा मूळचा भारतीय नाही, यावर पटकन विश्वास बसणे कठीण आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, समोशाचा उगम १० व्या ते ११ व्या शतकाच्या सुमारास मध्य पूर्वेत (Middle East) म्हणजेच प्राचीन पारस (Persia) प्रांतात झाला. इराणचे प्रसिद्ध इतिहासकार अबुल-फजल बैहाकी यांच्या ‘तारीख-ए-बैहाकी’ या ग्रंथात याचा सर्वात पहिला उल्लेख ‘संबोसा’ (Sambosa) असा आढळतो. मध्य युगात मध्य आशियातील व्यापारी आणि प्रवासी लांबच्या प्रवासाला निघताना सुक्या मेव्याचे आणि मांसाचे सारण भरलेले लहान त्रिकोणी संबोसे आपल्या घोड्यांच्या खोगीर पिशव्यांमध्ये (Saddle bags) बांधून घेऊन जात असत, जेणेकरून प्रवासात ते सहज खाता येतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
१३ व्या आणि १४ व्या शतकाच्या सुमारास व्यापारी, सुफी संत आणि मुघल आक्रमकांसोबत हा पदार्थ भारतीय उपखंडात आला. भारतात आल्यानंतर स्थानिक आचारी आणि खवय्यांनी याच्या रचनेत कमालीचा बदल केला. मांसाच्या सारणाची जागा उकडलेले बटाटे, हिरवे मटार, आणि खमंग देशी मसाल्यांनी घेतली. हळूहळू हा पदार्थ गल्लीबोळातील सर्वसामान्य माणसाच्या आहाराचा मुख्य भाग बनला.
काळानुसार समोशाच्या रूपात आणि चवीत अनेक नवनवीन प्रयोग झाले आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत समोशाची वेगळी शैली पाहायला मिळते:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर
अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते लोकसंस्कृती, संवाद आणि आपुलकीचे प्रतीक आहे, हीच आठवण जागतिक समोसा दिवस आपल्याला करून देतो. शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनमधील कटिंग चहा आणि समोशाच्या गप्पा असोत किंवा ऑफिसच्या ब्रेकदरम्यान सहकाऱ्यांसोबत शेअर केलेला समोसा असो, या पदार्थाने लाखो आठवणी समृद्ध केल्या आहेत.
५ सप्टेंबर रोजी जागतिक समोसा दिनानिमित्त लोक आपल्या मित्र-परिवारासोबत गरमागरम समोसे खाऊन आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करून हा दिवस खास पद्धतीने साजरा करतात. जर तुम्हीही खवय्ये असाल, तर आजच्या दिवशी तुमच्या आवडत्या समोशाचा आस्वाद नक्की घ्या!






