World Suicide Prevention Day 2025: आत्महत्या प्रतिबंधासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
पुणे/सुनयना सोनवणे : दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन १० सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. आत्महत्येसारख्या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येविषयी जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हा या दिनामागील मुख्य उद्देश आहे. या दिनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटना करते. जागतिक आरोग्य संघटना त्याला मान्यता देते. ‘आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे’ ही या वर्षीची थीम आहे. आत्महत्येबद्दल समाजात रुजलेलले गैरसमज आणि भीती दूर करण्यावर भर दिला जातो. आत्महत्येच्या येणाऱ्या विचारांच्या बाबतीत शांत बसणे चुकीचे आहे. योग्य संवाद, सहानुभूती आणि आधाराच्या मदतीने अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे ८ लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजे दर ४० सेकंदाला एक व्यक्ती या मार्गाने जीवन संपवते. प्रत्येक आत्महत्येसाठी किमान २० हून अधिक प्रयत्न होत असल्याचेही अहवाल स्पष्ट करतात. मानसिक आजार, नैराश्य, मद्यपानाचे व्यसन, आर्थिक अडचणी, नातेसंबंध तुटणे, एकाकीपणा, हिंसा आणि दीर्घकालीन आजार हे आत्महत्येचे प्रमुख कारण असल्याचे आढळून आले.
भारतात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. २०१६ मध्ये देशाचा आत्महत्या मृत्यू दर १,००,००० लोकसंख्येमागे १६.५ इतका होता, जो जागतिक सरासरी १०.५ पेक्षा जास्त आहे. १५ ते २९ वयोगटातील तरुण, विशेष गरजा असलेले नागरिक, वृद्ध हे सर्वाधिक धोक्याच्या श्रेणीत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आत्महत्या प्रतिबंधासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मानसिक आरोग्य कायदा २०१७ अंतर्गत आत्महत्येला गुन्हा न मानता प्रयत्न करणाऱ्यांना वैद्यकीय मदतीचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्रे, व्यसनमुक्ती व पुनर्वसन सेवा या माध्यमातून मदत पुरवली जात आहे.
सरकारने आखलेल्या राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरणात २०३० पर्यंत मृत्यूदरात १० टक्के घट घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अंतर्गत नेतृत्व मजबूत करणे, आरोग्यसेवांची क्षमता वाढवणे, समुदायात सहकार्य निर्माण करणे आणि आत्महत्येविषयीच्या कलंकाला आव्हान देणे यावर विशेष भर दिला जात आहे.
‘१५ते २९ या वयोगटात होणारे आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे समुपदेशक,मानसोपचारतज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. आत्महत्यापूर्वी येणाऱ्या विचारांवर काम करणे गरजेचे आहे. ‘टेली मानस’ हा २४ तास मोफत मानसिक आरोग्य सहाय्य सेवा प्रदान करणारा भारत सरकारचा उपक्रम आहे. त्यासाठी १४४१६ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. याची मदत अनेकांना होत आहे.’
-डॉ.निशिकांत थोरात,
मानसोपचार विभाग प्रमुख,
बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
‘वाढत्या आत्महत्या ही चिंताजनक गोष्ट आहे. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा यासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे. कॉलेज तसेच कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचे महत्त्व या विषयावर चर्चा व्हायला हवी. आपल्या जवळची एखादी व्यक्ती निराश, उदास, एकाकी दिसत असेल तर तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा. आपला मानसिक त्रास जवळच्या आणि विश्वासू व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त केला पाहिजे. गरज वाटल्यास तज्ञांची मदत घेतली पाहिजे.’
-भारत निलख, समुपदेशक, पुणे