सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक गुन्हे उघड होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता ऐरोलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील जप्त केला आहे.
Beed Crime: संतापजनक! जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईपने बेदम मारहाण; बीड येथील घटना
डॅनियल वाघमारे हा ऐरोली सेक्टर 14 मधील सप्तशृंगी सोसायटीत रहायला आहे. डॅनियल हा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण परराष्ट्र मंत्रालयात मोठ्या पदावर कामाला आहे, तसेच शासकीय यंत्रणेतील विविध विभागात मोठ्या पदावर काम करत आहे. असे सांगून नागरिकांची फसवणूक करत होता. याबाबतची तक्रार रबाळे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, यांनी गोपनीय पथकातील अंमलदार अनिल मोटे आणि ललित महाजन यांना या तोतया अधिकाऱ्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार दोन्ही अंमलदारांनी रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील कानाकोपऱ्यातील खोबर काढून आरोपीचा शोध घेऊन आरोपी डॅनियल वाघमारे याला ताब्यात घेतले. डॅनियल याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरातून केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे विविध विभागाचे अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच बनावट पासपोर्ट मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले, त्याचबरोबर आरोपी वाघमारे याच्या घरी टेलरची एक चिठ्ठी सापडली.
त्यात खाकी रंगाचा कपडा स्टेपलर केला असल्याचा आढळून आलं. पोलिसांनी संबंधित टेलर चौकशी केली असता, आरोपीने दोन दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकाऱ्यांसारखा ड्रेस शिवाय टाकला असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॅनियल वाघमारे या इसमाने आणखी कोणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नागरिकांना केले आहे.