ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत रविवारी ३० ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय हा विश्वचषकात आतापर्यंत लागोपाठ दोन सामने हरणाऱ्या पाकिस्तानसाठी स्पर्धेत पुन्हा जीवनदान देणारा ठरला असता. मात्र दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा भारताच्या पराभवांनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) भारताच्या पराभवामुळे दु:खी झाला आहे. शोएब अख्तर त्याच्या व्हिडीओ मध्ये म्हणाला, भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली असती तर 150 धावा केल्या असत्या. शोएब अख्तर म्हणाला, “भारताने आम्हाला दुखावले आहे. खरे तर यात भारताचा काही दोष नाही, आम्ही खूप वाईट खेळलो आणि आमचे नशीब इतरांवर सोडले.
टी २० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ फेरीत ग्रुप २ चा भाग असलेला भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या पराभवामुळे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.