आशिया कप 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. एका बाजूला क्रिकेट चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्साहित आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक या सामन्याला विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पंतप्रधान मोदी यांना एक सविस्तर पत्र लिहून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
एआयसीडब्ल्यूएने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “140 कोटी भारतीयांसह, अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) आज, 14 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करते आणि त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करते.”
या संघटनेने पुढे म्हटले की, “अशा वेळी जेव्हा आपला देश जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खात आहे, जिथे 26 निष्पाप भारतीयांना त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांचा धर्म विचारून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निर्घृणपणे मारले, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे हे आपल्या शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे.”
Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण
एआयसीडब्ल्यूएने बीसीसीआयवर गंभीर आरोप केला. त्यांनी पत्रात लिहिले, “भारत सरकारने आधीच पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक पाऊले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर, एआयसीडब्ल्यूएने यापूर्वीच पाकिस्तानी कलाकारांवर आणि ‘सरदार जी 3’ सारख्या चित्रपटांवर भारतात बंदी घातली होती. मात्र, बीसीसीआय देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देत असल्यासारखे दिसते आहे. खेळाच्या नावाखाली ते एका दहशतवादी देशासोबत संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी पुढे म्हटले, “बीसीसीआयसाठी जरी क्रिकेट सर्वोच्च असला, तरी भारताच्या लोकांसाठी आमचे राष्ट्र प्रथम येते.”
एआयसीडब्ल्यूएने पंतप्रधान मोदींकडे या सामन्याला तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले, “भारत-पाक यांच्यातील सामना आयोजित करणे हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे आपले प्राण गमावलेल्या सैनिकांच्या आणि नागरिकांच्या बलिदानासोबत विश्वासघात आहे.” या संघटनेने देशातील सर्व नागरिक, सेलिब्रिटी आणि चित्रपट निर्मात्यांना या सामन्यावर बहिष्कार टाकून विरोध करण्याचे आवाहनही केले आहे.