
अश्मिता चालिहाने रविवारी दक्षिण कोरिया येथे झालेल्या कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या चौथ्या मानांकित हान कियान शीला पराभूत करून आपले पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले. आसामच्या या २६ वर्षीय ५३ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ३५ व्या क्रमांकावर असलेल्या हानला १४-२१, २१-१४, २१-१४ असे पराभूत केले.
अंतिम सामन्याची सुरुवात अश्मितासाठी चांगली झाली नाही. पहिल्या गेममध्ये तिला आपला खेळ जमवण्यासाठी संघर्ष करावा लागला. याचा फायदा घेत हान चियान शीने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि पहिला गेम २१-१४ ने जिंकला. एका गेमने मागे पडल्यानंतर, अश्मिताने आपली आक्रमकता वाढवली. तिने दुसऱ्या गेममध्येही आक्रमक शॉट्स खेळत चिनी खेळाडूला दबावाखाली ठेवले. अश्मिताने दुसरा गेम २१-१४ ने जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला.
तिसऱ्या गेमच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोघीही गुण मिळवत राहिल्याने सामना अत्यंत चुरशीचा झाला. मात्र, मध्यंतरानंतर अश्मिताने हळूहळू सामन्यावर नियंत्रण मिळवले. तिने एक अचूक विनर मारून १२-११ अशी आघाडी घेतली. त्यानंतर, अश्मिताने कोर्टच्या बाहेर जाणारा एक अवघड शॉट यशस्वीपणे डिफेन्ड करुन आघाडी १५-११ पर्यंत वाढवली. अश्मिताने एका अप्रतिम क्रॉस-कोर्ट विनरने १९-१४ अशी आघाडी घेतली. पुढच्या रिटर्नवर हानचे शटल बाहेर गेल्याने, भारतीय खेळाडू विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली. अखेरीस,अश्मिताने तिसरा गेम २१-१४ ने जिंकून विजेतेपद पटकावले.
Ashmita Chaliha 🇮🇳 and Han Qian Xi 🇨🇳 clash for the title.#BWFWorldTour #KoreaMasters2026 pic.twitter.com/PP94HechlM — BWF (@bwfmedia) August 9, 2026
कोरिया मास्टर्समधील हा विजय अस्मिता चालिहाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय आहे. तसेच, हे तिचे BWF वर्ल्ड टूरच्या सुपर 300 स्तरावरील पहिले विजेतेपद आहे. पहिला गेम गमावल्यानंतर अश्मिताने ज्या प्रकारे पुनरागमन केले, त्यातून तिची दबावाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता दिसून येते. निर्णायक गेममध्येही, अटीतटीच्या लढतीत तिने आपला संयम राखला आणि महत्त्वाच्या क्षणी आक्रमक खेळ दाखवून इतिहास रचला.