Anahat Singh Won Silver in Squash
अंतिम सामन्यात, मलेशियाच्या शिवसंगारीने पहिल्या सेटमध्ये ६-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अनाहतवर दबाव आणला. शिवसंगारीने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमक खेळाने रॅलीवर नियंत्रण मिळवले आणि पहिला सेट ११-४ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही अनाहत ६-२ ने मागे पडली. शिवसंगारीने पुन्हा शानदार कामगिरी करत दुसरा सेट ११-४ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही अनाहतला मोठी आघाडी घेता आली नाही. ती सुरुवातीलाच ४-० ने मागे पडली. या सामन्यात शिवसंगारीने एका चॅम्पियनप्रमाणे कामगिरी करत तिसरा सेट ११-७ ने जिंकून सुवर्णपदक पटकावले. तर अनाहतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अनाहत ही आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेच्या महिला एकेरी स्क्वॅश अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे, अनाहत सिंगने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांमध्ये थेट स्थान मिळवण्याची संधी गमावली आहे.
स्क्वॉशमध्ये सुवर्णपदकासाठी आज दोन सामने खेळवे गेले. भारताने दोन्हीमध्ये रौप्यपदक जिंकले. दोन्ही खेळाडूंचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.अनाहत व्यतिरिक्त, पुरुष एकेरी स्क्वॅश स्पर्धेत, भारताच्या अभय सिंगला सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाच्या युन यू एनजीकडून ११-९, ११-५, ११-५ अशा तिन्ही सेटमध्ये एकतर्फी पराभव पत्करावा लागला. अभयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी, तो २०१४ आणि २०२३ मध्ये एकेरीत रौप्यपदक जिंकणाऱ्या सौरव घोषालनंतर या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला. परंतु, अंतिम सामन्यातील या पराभवामुळे तो लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरू शकला नाही.






