Youth Olympics : यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला बॉक्सिंग गोल्ड! अंबेकर मीतेईचा ऐतिहासिक 'गोल्डन पंच', सौजन्य : आयएएनएस
अंतिम सामना अंबेकरसाठी सुरुवातीला आव्हानात्मक ठरला. पहिल्या फेरीत पाचही पंचांनी आयर्लंडच्या जुबानीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे भारतीय बॉक्सरवर दडपण निर्माण झाले होते. मात्र, अंबेकरने हार न मानता दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन केले. या फेरीत पाचपैकी तीन पंचांनी त्याच्या बाजूने निर्णय दिला.
तिसऱ्या आणि निर्णायक फेरीत अंबेकरने आपला खेळ आणखी उंचावला. पाचपैकी चार पंचांनी त्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे एकूण 3-2 अशा फरकाने त्याने अंतिम सामना जिंकत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.
अंबेकरच्या या विजयामुळे डकार यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचे सुवर्णपदकाचे खातेही उघडले. यापूर्वी भारतीय खेळाडूंनी कुस्ती, जलतरण यांसह विविध क्रीडा प्रकारांत तीन रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली होती.
अंबेकरचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही प्रभावी ठरला. त्याने नामिबियाच्या अब्राहम कालेन्गा याच्याविरुद्ध दमदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्या फेरीत 1 मिनिट ५७ सेकंदांवर रेफरी स्टॉप्स कॉन्टेस्ट (RSC) नियमानुसार त्याला विजयी घोषित करण्यात आले.
त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने सेनेगलच्या फे शेख इब्राहिमा फॉल याचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. उपांत्य फेरीतही त्याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. कोलंबियाच्या इजोन जेफरी गॅलिया अरेवालो याला ५-० अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
यूथ ऑलिम्पिकमधील भारतीय बॉक्सिंगचा इतिहास पाहिला तर 2010 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या यूथ ऑलिम्पिकमध्ये शिव थापाने पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. त्याच स्पर्धेत विकास कृष्णनने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले होते.
आता अंबेकर मीतेईने या दोघांच्या कामगिरीच्या पुढे एक पाऊल टाकत यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय बॉक्सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Ans: मणिपूरचा युवा बॉक्सर लैरेनलाकपाम अंबेकर मीतेई याने भारतासाठी पहिले बॉक्सिंग सुवर्णपदक जिंकले.
Ans: त्याने आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानी याचा 3-2 असा पराभव केला.
Ans: त्याने पुरुषांच्या 50 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता.






