अजित पवारांच्या विमान अपघातावरील रामदास कदमांच्या विधानावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मारणाऱ्यांची काठी धरू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही,’ असं मिश्किल पण सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मात्र, अपघाताची वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
रामदास कदम यांनी अपघातापूर्वी काही बैठका झाल्याचा उल्लेख करत संशय व्यक्त केला होता. याबाबत विचारलं असता गोगावले म्हणाले की, एखादा पायलट आजच्या काळात स्वतःचा जीव का देईल, असा प्रश्न पडतो. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे समोर येणं महत्त्वाचं आहे. चौकशीतील तथ्य समोर येण्याआधी अशा चर्चांना फारसा अर्थ नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही गोगावले यांनी भाष्य केलं. निवडणुकीच्या वेळी तिकीट जाहीर होण्याआधी रामदास कदम यांनीच तटकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, असं त्यांनी सांगितलं. कदम हे आमचे ज्येष्ठ नेते असल्याने आम्हाला काही मर्यादा आहेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून या वादावर काहीतरी तोडगा निघेल, असंही ते म्हणाले.
शिंदे साहेबांनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं.
मंत्री संजय शिरसाठ यांनी दोन्ही राष्ट्रवादी वेगळे होऊन नवा गट निर्माण होण्याबाबत केलेल्या विधानावरही गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर शिरसाठ यांना काही माहिती मिळाली असेल, तर पुढील कॅबिनेट बैठकीत त्यांनाच विचारणार असल्याचं त्यांनी मिश्किलपणे सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानावर गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील हे गुलाबासारखे आहेत, असं म्हणत त्यांनी त्यांच्या विधानावर मिश्किल टिप्पणी केली. सध्याच्या परिस्थितीत असं काही घडेल, असं वाटत नाही. मात्र, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूणच अजित पवारांच्या विमान अपघातापासून ते महायुतीतील अंतर्गत वाद आणि शिवसेनेच्या संभाव्य एकत्रीकरणापर्यंत अनेक मुद्द्यांवर भरत गोगावले यांनी आपली भूमिका मांडली आहे.
NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Ans: रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी काही बैठका झाल्याचा उल्लेख करत अपघाताबाबत संशय व्यक्त केला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
Ans: 'मारणाऱ्यांची काठी धरू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही,' असं भरत गोगावले म्हणाले. अपघाताची वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Ans: रामदास कदम यांनी यापूर्वी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, असं गोगावले म्हणाले. दोन्ही नेत्यांमधील वादावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून तोडगा निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.






