
आशियाई खेळात सर्वांना समान वागणूक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रघुराम अय्यर यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर बीसीसीआयने ठरवले की त्यांच्या क्रिकेटपटूंनी ऐची-नागोया येथील अधिकृत आशियाई खेळांच्या हॉटेल्सच्या बाहेर राहावे, तर हॉटेल, भोजन, वाहतूक आणि खेळाडू वेळेवर मैदानावर पोहोचतील याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी बीसीसीआयची असेल. बीसीसीआय स्वतःची व्यवस्था करण्यास स्वतंत्र आहे, परंतु लॉजिस्टिक्सची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल.
दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
रघुराम अय्यर यांनी या गोष्टीवर जोर दिला की, ३६ खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या संपूर्ण भारतीय पथकाला समान वागणूक मिळेल याची खात्री करणे ही आयओएची जबाबदारी आहे. अय्यर म्हणाले, ‘बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आमची फलदायी चर्चा झाली. सुविधांचे मूल्यांकन करण्यासाठी ते जपानला एक अग्रिम पथक पाठवण्याचा विचार करत आहेत. याला आयओएचा कोणताही आक्षेप नाही. त्यांच्या मूल्यांकनाच्या आधारे, त्यांना आयोजकांच्या सुविधा वापरायच्या आहेत की स्वतःची व्यवस्था करायची आहे, हे ते ठरवू शकतात. आयओएतर्फे सर्व खेळ, खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण प्रतिनिधी मंडळाला समान वागणूक दिली जाते. कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही.’
वृत्तानुसार, भारतीय पुरुष संघाला थ्री-स्टार एपीए हॉटेल नागोया अकामाए, तर महिला संघाला फोर-स्टार मेइतेत्सु ग्रँड हॉटेल देण्यात आले आहे. तथापि, ही दोन्ही हॉटेल्स भारतीय खेळाडूंना सामान्यतः सवय असलेल्या फाईव्ह-स्टार श्रेणीपेक्षा एक पायरी खाली आहेत. शिवाय, ट्विन-शेअरिंग रूम्स, ज्यात दोन खेळाडू एकत्र राहणार आहेत, हा देखील वादाचा एक मोठा मुद्दा बनला आहे. कारण यावर BCCI ने आक्षेप घेतला होता. यावर आता IOA ने स्पष्ट मत मांडले आहे आणि भारतीय संघाची व्यवस्था इतर खेळाडूंप्रमाणेच करण्यात आली असून अन्य व्यवस्था हवी असल्यास बीसीसीआयने स्वतः खर्च करावा असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.