या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केवळ १९८ धावा केल्या.त्यानंतर बांग्लादेशचा संघ ४२६ धावांवर सर्वबाद झाला. यामुळे बांगलादेशला २२८ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खराब झाली आणि संघाने २०७ धावांत सात विकेट्स गमावले. तर त्यानंतर ग्रीनने स्टार्कसोबत भागीदारी करून संघाला आघाडी मिळवून देण्यात यश मिळवले. चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सात विकेट्स गमावून २४३ धावा केल्या होत्या. मात्र, जेवणाच्या विश्रांतीनंतर मिचेल स्टार्कच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला. ग्रीन आणि स्टार्कने आठव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. तस्किन अहमदने स्टार्कला बाद करून ही भागीदारी तोडली. स्टार्क १८ धावांवर बाद झाला. बांग्लादेशने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २८४ धावांवर गुंडाळले.
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशसमोर ५७ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले. बांग्लादेशने केवळ एक विकेट गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. पहिल्या डावातील शतकवीर तन्झिद हसन तमीम पाच चेंडूंवर बाद झाला असला तरी, पाहुण्या संघाने केवळ १४.२ षटकांत आणि फक्त एक विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले. हा विजय बांगलादेशसाठी ऐतिहासिक आहे, कारण त्यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यात ‘कांगारू’ संघाला कधीही पराभूत केले नव्हते.
या ऐतिहासिक विजयासह, बांग्लादेश गेल्या ३० वर्षांत ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारा भारता नंतरचा दुसरा आशियाई संघ ठरला आहे. यापूर्वी, पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी विजय नोव्हेंबर-डिसेंबर १९९५ मध्ये मिळवला होता. यामुळे बांग्लादेश ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी सामना जिंकणारा आशियाई संघ ठरला आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात आपला पहिला कसोटी विजय सातव्या प्रयत्नात मिळवला, तर भारताला ऑस्ट्रेलियन भूमीवर आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी १२व्या कसोटीपर्यंत वाट पाहावी लागली.