मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले(फोटो-सोशल मीडिया)
CM Fadnavis Inaugurates Tournament : काल, रविवारी संध्याकाळी शंकर नगर येथील डीकेएम क्लब कोर्टवर ७५ व्या सीएम कप राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला सांगण्यात आले आहे की खेळात राजकारणापेक्षा राजकारण जास्त असते. परंतु मी सर्व खेळाडूंना त्यापासून दूर राहून खेळाची खरी भावना आत्मसात करण्याचे आवाहन या वेळी करतो.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून नागपूरला आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून खेळाडूंना ही स्पर्धा खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन रकण्यात आले. फडणवीस म्हणाले की, खेळ आपल्याला पराभवात नम्रता आणि विजयात संयम शिकवत असतो. खेळाडूने नेहमीच निर्णय स्वीकारला पाहिजे आणि त्याच्या पूर्ण क्षमतेने मैदानात उतरायला हवे.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या संघांना रोख प्रोत्साहन देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन (एमएसबीए) चा निर्णय ऐतिहासिक असाच आहे, असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले. फडणवीस म्हणाले की, “मी संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण संघाचे मनापासून अभिनंद करतो. देशातील कोणत्याही राज्याकडून घेण्यात आलेला हा पहिलाच निर्णय आहे. यामुळे खेळाडूंना ओळख आणि प्रेरणा दोन्ही मिळणार आहे.” त्यांनी यावेळी पंजाबमध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या १८ वर्षांखालील मुलींच्या संघाच्या आणि उत्तराखंडमध्ये उपविजेत्यापद पटकावणाऱ्या १३ वर्षांखालील मुलींच्या संघाच्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि व्यवस्थापकांना प्रत्येकी २५,००० रुपयांचे बक्षीस प्रदान केले.
यावेळी स्पर्धेत तिसरे स्थान मिळवणाऱ्या १३ वर्षांखालील मुलांच्या संघाच्या खेळाडूंना प्रत्येकी १०,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे. याप्रसंगी एमएसबीएचे अध्यक्ष जोशी, आमदार विकास ठाकरे, बीएफआय सचिव कुलविंदर गिल आणि डॉ. अंबुलकर याप्रसंगी उपस्थित होते. डॉ. सालपेनकर यांनी समारंभाचे संचालन केले आणि आभार मानले.






